Published on
:
27 Nov 2024, 7:33 am
Updated on
:
27 Nov 2024, 7:33 am
गोरक्ष शेजूळ
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आता महायुतीची अर्थात भाजपची ताकद येथे वाढलेली दिसत आहे. नगर भाजपला मिळालेला विखेंचा चेहरा आणि जनतेचा मूड पाहता जिल्हा परिषदेच्या 58 वर्षांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजपला मिनी मंत्रालयाची सत्ता मिळविण्याची ही संधी समजली जात आहे.
स्थापना झाल्यानंतर 1962 पासून जिल्हा परिषदेला बहुतांश वेळा काँग्रेस विचारसरणीचेच अध्यक्ष मिळाले. पहिले अध्यक्ष म्हणून शंकरराव काळे यांना 1962-67 आणि त्यानंतर दुसर्यांदाही 1967-1972 पर्यंत सलग संधी मिळाली होती. त्यानंतरही अनेक अध्यक्ष झाले, ते सर्व काँग़्रेस विचारधारेचे होते. 1992 ते 97 या कालावधीत कम्युनिस्ट विचारसरणीचे कॉ. अरुण कडू अध्यक्ष झाले होते. हा अपवात वगळता जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व दिसले. मात्र 1999 नंतर काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतर उदयास आलेल्या राष्ट्रवादीचीही जिल्ह्यात मोठी ताकद तयार झाली. काँग़्रेस-राष्ट्रवादीची जिल्ह्यात आघाडी झाली.
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा जागांनुसार फॉर्म्युला पुढे आला. यातून 2002-2005 या कालावधीत राष्ट्रवादीचे मिस्टर दादा शेलार हे अध्यक्ष झाले, त्यानंतर 2005-2007 बाबासाहेब भिटे हे देखील राष्ट्रवादीकडून अध्यक्ष झाल्याचे दिसले. त्यानंतर 2007-2012 या कालावधीत पुन्हा काँग़्रेसच्या जागा अधिक आल्या. त्यावेळी शालिनीताई विखे पाटील अध्यक्ष झाल्या. 2012-14 या कालावधीत गडाखांच्या शिष्टाईने भाजपचे विठ्ठल लंघे यांना राष्ट्रवादीत आणून त्यांना अध्यक्षपद देण्यात आले. पुढे 2014-2017 साली मंजूषा गुंड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर 2017 मध्ये निवडणुका होऊन त्यात काँग़्रेसच्या जागा अधिक आल्या आणि शालिनीताई विखे पाटील दुसर्यांदा अध्यक्ष झाल्या. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा राजकीय समीकरणे बदलली. विखे पाटील भाजपात गेले, त्यामुळे येथे राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. मार्च 2022 पासून प्रशासक आले. त्यानंतर आजपर्यंत अडीच वर्षांचा कालखंड उलटला तरीही अजून निवडणुका नसल्याने प्रशासकच कारभार हाकत आहेत.
दरम्यान, विधानसभेत महायुतीला मोठे यश मिळाले. 10 आमदार त्यांचे निवडून आले आहेत. हाच टेम्पो पकडून त्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याची भाजपचे नेते प्रयत्नशील आहे. तशी कार्यकर्त्यांचीही मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात महायुतीने ही निवडणूक लढविल्यास 58 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला झेडपीवर आपला झेंडा रोवण्याची ही संधी समजली जात आहे. अर्थात महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या पराभूत झालेल्या शिलेदारांना पुन्हा ऊर्जा देताना स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्याचे समजले आहे.
त्यांनाही जनतेची काहीशी सहानुभूती असेल, असे चित्र आहे. त्यामुळे विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
सध्याचे आमदारांचे संख्याबळ
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 12 पैकी राष्ट्रवादी अजित पवारांचे अकोलेत किरण लहामटे, कोपरगाव आशुतोष काळे, नगर संग्राम जगताप, पारनेर काशीनाथ दाते, असे चार, भाजपाचे शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी शिवाजी कर्डिले, श्रीगोंदा विक्रमसिंह पाचपुते, शेवगाव-पाथर्डी मोनीका राजळे, असे चार आणि शिवसेनेचे नेवासा विठ्ठलराव लंघे, संगमनेर अमोल खताळ हे दोन असे दहा मतदार संघात महायुतीचे आमदार निवडून आले. या दहा मतदार संघात जिल्हा परिषदेचे सुमारे 65 गट आणि 130 गण आहेत. तर श्रीरामपूर हेमंत ओगले आणि कर्जत जामखेड रोहित पवार हे दोनच मतदार संघ महाविकास आघाडीकडे असून या ठिकाणी 10 गट आणि 20 गण आहेत.
तत्कालीन आमदारांची राजकीय ताकद
2017 निवडणुकीवेळी शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरात बाळासाहेब थोरात, श्रीरामपुरात भाऊसाहेब कांबळे असे काँग़्रेसचे तीन आमदार होते. तर राष्ट्रवादीकडून अकोल्यात वैभव पिचड, श्रीगोंद्यात राहुल जगताप आणि शहरात संग्राम जगताप असे तीन आमदार होते. युतीत कर्जत जामखेडमध्ये प्रा. राम शिंदे, कोपरगावात स्नेहलता कोल्हे, राहुरीत शिवाजी कर्डिले, शेवगावात मोनिका राजळे, नेवाशात बाळासाहेब मुरकुटे हे पाच आमदार भाजपचे होते. तर विजय औटी हे शिवसेनेचे आमदार होते. आघाडीकडे सहा आणि युतीकडे सहा असे आमदारांचे समान संख्याबळ होते.
आतापर्यंतचे अध्यक्ष व पक्षीय विचारधारा
शंकरराव काळे (काँग्रेस)
रामनाथ वाघ (काँग्रेस)
यशवंतराव गडाख (काँग्रेस)
ज्ञानदेव कासार (काँग्रेस)
आप्पासाहेब राजळे (काँग्रेस)
बाबासाहेब पवार (काँग्रेस)
अरूण कडू (काँग्रेस)
डॉ.विमल ढेरे (काँग्रेस)
अशोक भांगरे (काँग्रेस)
नरेंद्र घुले (काँग्रेंस)
बाबासाहेब भोस (काँग्रेस)
मिस्टर दादा शेलार (राष्ट्रवादी)
बाबासाहेब भिटे (राष्ट्रवादी)
शालिनीताई विखे पाटील (काँग्रेस)
विठ्ठलराव लंघे (राष्ट्रवादी)
मंजुषा गुंड (राष्ट्रवादी)
शालिनीताई विखे पाटील (काँग्रेस)
राजश्री घुले (राष्ट्रवादी)