Published on
:
27 Nov 2024, 7:21 am
Updated on
:
27 Nov 2024, 7:21 am
पिंपळनेर, जि. धुळे | घरात विवाह सोहळ्याची लगबग, अंगणात मंडप, प्रवेशद्वारावर लावलेले आंब्याच्या पानाचं तोरण, एकुलत्या एक मुलाच्या लग्नाचा सायंकाळी हळदीचा कार्यक्रम,शुभ विवाह सोहळ्याची जय्यत तयारी झालेली. घरातील सर्व सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण, पाहुण्यांची वर्दळ, नववधू त्यांच्या नातेवाईकां समवेत लग्न घरी पोहोचल्या असे सारे काही आनंदाचे वातावरण सुरू असताना अचानक मुलाच्या आईचे प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारार्थ खाजगी दवाखान्यात दाखल केले असता त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे नेत असतांना अचानक रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मुलाच्या विवाह सोहळ्याच्या एक दिवस आधीच मातेने जगाचा निरोप घेतल्याची घटना पिंपळनेर शहरात घडली. यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील स्वामी समर्थ नगरात राहणाऱ्या सुवर्णकार समाजाच्या शकुंतलाबाई त्र्यंबक भामरे वय वर्ष 60 यांची प्रकृती काहीशी बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना स्थिर तब्येत होण्यासाठी धुळे येथे हलविण्याचा सल्ला दिला असता शकुंतलाबाई यांच्या नातेवाईकांनी धुळे येथे वाहनाने नेले असता रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शकुंतला भामरे यांचा मुलगा चिरंजीव पवन याचा विवाह आज ता. 27 नोव्हेंबर रोजी आयोजित होता. काल ता. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते त्यातच शकुंतलाबाई यांना त्यांचे प्रकृती काही प्रमाणात बिघडल्याने त्यांना येथील खाजगी रुग्णालयात एक दिवस आधी दाखल करण्यात आले होते रात्रभर तब्येत स्थिर असतांना दुसऱ्या दिवशी अर्थातच काल मंगळवारी त्यांची तब्येत काहीशी बिघडली यामुळे त्यांना धुळे येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याकारणाने उपचारार्थ धुळे येथे नेत असताना त्यांची प्राणज्योत रस्त्यातच मालवली.
इकडे लग्नाची संपूर्ण तयारी सुरू होती. लग्नासाठी स्वीट तथा मिठाई तयार करण्याचे कामही युद्ध पातळीवर तयार सुरू होते. लग्नघरात पाहुण्यांची वर्दळही सुरू झाली होती. घरात आनंदाचे वातावरण होते. प्रवेशद्वाराला आंब्यांचा व फुलांचे तोरणही लावण्यात आले होते. अंगणात मांडव उभारण्यात आला होता व सायंकाळी हळदीचा सोहळा होणार होता त्याआधीच आपल्या मातेने मुलाच्या हळदीचा कार्यक्रम नियतीने बघू दिला नाही. अत्यंत दुर्दैवी घटना भामरे परिवारावर घडल्याने पिंपळनेरसह परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. शकुंतलाबाई भामरे यांच्या पश्चात पती त्र्यंबक भामरे, मुलगा पवन व एक मुलगी तीन भाऊ असा परिवार आहे. काल ता. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शकुंतलाबाई भामरे यांच्यावर पिंपळनेर येथील अमरधाममध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.