लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘बटेंगे ते कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा देऊन भाजपने मतांचे ध्रुवीकरण केले. गेल्या 11 वर्षापासून सत्तेत असूनही विशिष्ठ समाजाची भीती दाखवून मतदारांना घाबरवण्याचा हा प्रकार सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडला. सोशल मीडियावरही यावरून रान उठलेले असतानाच आता मध्य प्रदेशमधील भाजप सरकारमध्ये मंत्री असलेल्या गौतम टेटवाल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अजान ऐकून भाषण थांबवणारे मंत्री गौतम टेटवाल हे मंचावरूनच ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ म्हणताना दिसताहेत.
मध्य प्रदेशमधील डॉ. मोहन यादव सरकारमध्ये गौतम टेटवाल हे मंत्री आहेत. राजगढ जिल्ह्यातील मऊ गावात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. गौतम टेटवाल हे भाषण करत असताना अजान सुरू झाली. अजान सुरू झाल्याचे ऐकताच टेटवाल यांनी भाषण थांबवले. अजान संपताच त्यांनी आधी संस्कृतमधील एक श्लोक म्हटला आणि त्यानंतर ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह…’ म्हणत कलमा पढला. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, मंचावरून भाजपच्याच मंत्र्याने कलमा पढल्याने संस्कृती बचाव मंचाने विरोध केला आहे. संस्कृती बचाव मंचाचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, मंत्री सर्व धर्माचा आदर करतात यात दुमत नाही. पण आम्ही हिंदुत्ववादी लोकं त्यांच्यासाठी लढाई लढतोय. मंदिरात आरती सुरू असल्यावर कोणताच मंत्री आपले भाषण थांबवत नाही किंवा त्यात सहभागी होत नाही. पण अजान सुरू झाली की भाषण थांबवतात आणि आता तर स्वत: कलमा पढत आहेत. उद्या नमाजही पढताल, असा संताप तिवारी यांनी व्यक्त केला.
– अजान ऐकून भाजपच्या मंत्र्यानं थांबवलं भाषण; ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ म्हणत मंचावरूनच कलमा पढला
– मध्य प्रदेशमधील भाजप सरकारमध्ये मंत्री असलेल्या गौतम टेटवाल यांचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/j706wUF478
— Saamana Online (@SaamanaOnline) November 27, 2024
गौतम टेटवाल हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी आणि आपण भर मंचावर जे केले ते योग्य आहे का याचा विचार करावा. आपण योग्य केले असे त्यांना वाटत असेल तर हिंदू समाजही त्यांच्याबाबत वेगळा विचार करायला मोकळा, असेही ते म्हणाले.
कोण आहेत गौतम टेटवाल?
गौतम टेटवाल भाजपचे आमदार आहेत. राजगढ जिल्ह्यातील सारंगपूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक जिंकले होते. डॉ. मोहन यादव सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री बनवण्यात आले. 2008 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले होते. त्यानंतर 2013 आणि 2018 मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. परंतु यंदा विद्यमान आमदार कुंवर कोठार यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि निवडून आल्यावर राज्यमंत्रीपदही त्यांना मिळाले.