संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून आक्रमक झाली आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. तसेच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अद्याप मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे या गंभीर मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
काँग्रेस खासदार हिबी ईडन यांनी बुधवारी लोकसभेत मणिपूरमधील ‘बिघडत चाललेल्या स्थिती’वर चर्चेची मागणी करत स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. हिबी ईडन यांनी सरकारने आता पुढाकार घ्यावा आणि मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना सुरू कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सभागृहाचे कामकाजात स्थगन प्रस्ताव आपण मांडत आहोत. मणिपूरमधील सततचा हिंसाचाराबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मणिपूर हिंसाचारादरम्यान गेल्या दोन वर्षांपासून अनेक मृत्यू, मोठ्या प्रमाणावर विस्थापन आणि मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. सशस्त्र गटांची भूमिका आणि प्रक्षोभक सामग्रीच्या प्रसारामुळे लोकांमधील अविश्वास वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लैंगिक हिंसाचाराची प्रकरणे, विशेषत: महिलांवरील अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता सभागृहाने मणिपूरमधील बिघडलेल्या परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबण्यात याव्यात. वाढत्या हिंसाचारामुळे राज्याची सामाजिक बांधणी आणि देशाची लोकशाही मूल्ये धोक्यात आली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचार आणि महिला अत्याचाराच्या घटनांबाबतही त्यांनी माहिती दिली.