गेल्या कित्येक पिढ्यांपासून आदिवासी समाजाला रोजगाराच्या नावाखाली वीटभट्टीच्या चक्रव्यूहात डांबून ठेवल्याचे वास्तवदर्शी चित्र आजही ठाणे, पालघर सह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिवंत स्वरूपात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आधुनिकतेच्या प्रवाहात आजही या वीटभट्टी कामगारांच्या पिढ्यांचे गुदमरलेले भवितव्य वीटभट्टीच्या अग्नीत भस्मसात होतांना पाहायला मिळत आहे.
स्वातंत्र्याचा सुवर्णकाळ आज आपण उपभोगत असलो तरी या देशातील मूळनिवासी आदिम जमात असणार्या कातकरी समाजाच्या जीवनात ‘स्वातंत्र्याची पहाट’ कधी उगवलीच नाही. इतर समाजांपेक्षा ‘वेगळीच’ जीवनशैली जगणारा हा कातकरी समाज कायमचा ‘गावकुसाबाहेर’ राहिला गेला. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर विविध योजना सुरु झाल्या खर्या, मात्र त्यांची अंमलबजावणी नेमकी कुठे झाली? हा संशोधनाचा विषय आहे. आजही हजारो कातकरी कुटुंबे दिवाळी संपताच रोजगाराच्या शोधात तालुक्याबाहेर, जिल्ह्याबाहेर वीटभट्ट्यांवर स्थलांतरित झाली आहेत. मूळनिवासी असणार्या या समाजाच्या मालकीची शेतजमीन नाही, शिक्षण नाही, त्यातच व्यसनाधीनता, कुपोषण, बालविवाह इ. समस्यांचा डोंगर यांच्या वाट्याला पिढ्यानपिढ्या आहे. त्यामुळे शासनाने रोजगार हमी योजना केवळ कागदावर राबवून ठेकेदारांच्या फायद्यासाठीच असल्याने हे वर्षानुवर्षाचे स्थलांतर रोखणार तरी कसे?
शासनाची रोजगार हमी योजनेची कामेही डिसेंबर नंतर सुरु होतात. त्यात ती कामे ठेकेदार यंत्रसामग्री वापरून करतो, त्यामुळे तिथेही काम मिळण्याची शाश्वती नसते. पावसाळ्यात गावात शेतमजूर म्हणून काम मिळते. मात्र दिवाळीनंतर पोटाची भूक भागविण्यासाठी हा समाज जिल्ह्यातील इतर तालुक्यांत तसेच नाशिक, जुन्नर, आळेफाटा, पुणे, अहमदनगर या परजिल्ह्यातील वीट भट्ट्यांवर कामासाठी जातो. नोव्हेंबर ते मे या कालावधीत वीट भट्ट्यांवर काम केल्यानंतर पुन्हा पावसाळ्यात हा समाज गावाकडे परततो.
नवरा- बायकोच्या एका जोडीला ग्रामीण भागात ‘पातली’ असे संबोधतात. बहुतांशी सर्वच वीट भट्टी मालक मे महिन्यात ही ‘पातली’ घरी परतताना त्यांना पुढील वर्षासाठी आगाऊ रक्कम जबरदस्तीने देतो. त्यामुळे त्यांना जरी स्थानिक ठिकाणी रोजगार मिळाला तरी वीट भट्टीवर नाईलाजाने कामावर जावेच लागते. त्यातच जर एखाद्या ‘पातल्या’ने नकार दिला तर प्रसंगी वीट भट्टी मालकाची जुलूमशाही त्यांना गप गुमान सहन करावी लागते. याबाबतच्या अनेक घटना वारंवार कानावर येत असतात.
वीट भट्टीवर कामासाठी भल्या पहाटेच उठावे लागते. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान कडाक्याची थंडी असतानाही अंगावर काम घेतल्याने चिखल करणे, विटा थापणे, भट्टी रचणे इ. कामे दिवसभर उभे राहूनच करावी लागतात. या बदल्यात वीट भट्टी मालकाकडून आधीच ‘उचल’ घेतल्यामुळे आठवड्याला तुटपुंजी ‘खर्ची’ दिली जाते. या पैशात घरातील सामान-सुमान आणला जातो. त्यातच या समाजातील नवरा आणि बायको दोघांमध्ये व्यसनाचे प्रमाण असल्यामुळे त्यांच्या कष्टाचा बराचसा पैसा हा यामध्ये सुध्दा खर्च होतो.
मुलेही कायम शिक्षणापासून वंचित
कायम स्थलांतरित असणार्या या समाजातील मुलेही कायम शिक्षणापासून वंचित राहतात. जून मध्ये गावातील शाळेत जाणारी ही मुले दिवाळी नंतर मात्र आई - वडिलांसोबत भट्ट्यांवर जातात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची वाट कायम नागमोडीच राहिली आहे. घाटमाथ्यावर उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी ‘साखरशाळा’ ही योजना सुरु केली आहे. याच धर्तीवर शासनाने या वीट भट्टीवर स्थलांतरितांच्या मुलांसाठी ‘हंगामी वस्तीशाळा’ सुरु केल्या होत्या. मात्र त्या शाळांच्या उपक्रमात बराच गैरव्यवहार झाल्याने या शाळादेखील काही ठिकाणी बंद झाल्या आहेत. यामुळे ही मुलेही भट्ट्यांवर आई-वडिलांसोबत काम करताना दिसतात.