Published on
:
27 Nov 2024, 4:48 am
Updated on
:
27 Nov 2024, 4:48 am
मालेगाव : आमदार मुफ्ती इस्माईल यांचे समर्थक माजी नगरसेवक नदिमुद्दीन अलीमुद्दीन ऊर्फ नदीम फिटर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. समयसूचकता दाखवून नदीम घरात घुसल्याने थोडक्यात बचावले. हा प्रकार आझादनगर भागातील बाग- ए- महेमूद परिसरात रविवारी (दि. 24) रात्री 11.45 च्या सुमारास घडला. पोलिसांनी घटनास्थळावरून जिवंत काडतूस व रिकामी पुंगळी जप्त केली आहे.
नदीम फिटर हे बाग- ए- महेमूद भागातील त्यांच्या घराबाहेर गप्पा मारत उभे होते. त्यानंतर ते घराबाहेर दुचाकीजवळ येऊन थांबले असता, दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. नदीम हे घरात पळाल्याने त्यांना गोळी लागली नाही. गोळीबार करून दोघेही संशयित फरार झाले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून जमाव पांगविला. घटनास्थळावरून रिकामी पुंगळी व जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.
गोळीबार राजकीय वैमनस्यातून तसेच आर्थिक वादातून की, बनाव याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा लवकरच उलगडा होईल, असे संधू यांनी सांगितले.
राजकीय पक्ष कार्यकर्ते व समर्थकांना तंबी
विधानसभेच्या निकालानंतर काही उपद्रवी व्यक्ती शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कायदा हातात घ्याल तर याद राखा, अशी तंबी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी राजकीय पक्ष कार्यकर्ते व समर्थकांना दिली आहे. निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये वाद होत आहेत