अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची खडानखडा माहिती असणार्या आणि करेक्ट कार्यक्रमात माहिर असणार्या शरद पवार यांचा करिष्मा विधानसभा निवडणुकीत दिसला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी थेट लढत देत पवारांच्या चार उमेदवारांचा पराभव करीत जिल्ह्यावर अजित पवार यांचेच राजकीय वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. गेल्या 40 वर्षांनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच शरद पवार समर्थक एकही उमेदवार निवडून आलेला नाही.
देशाच्या राजकीय क्षेत्रात मोठा दबदबा असलेले शरद पवार गेल्या सहा दशकांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्यात 1978 मध्ये पुलोद प्रयोग करून ते देशपातळीवर चमकले. तेव्हापासून जिल्ह्यातील सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.
गेल्या 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पवारांच्या झंझावातात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार निवडून आले. परंतु पुतणे अजित पवार यांनी अडीच वर्षांपूर्वी 37 आमदार बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडले. यामध्ये जिल्ह्यातील संग्राम जगताप, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे व नीलेश लंके या आमदारांचा समावेश होता. मात्र, लोकसभेच्या पूर्वसंध्येलाच लंके यांनी परतीची वाट धरली. प्रस्थापित नेतेमंडळीच पक्षात नसतानाही पवारांनी उभारीने लोकसभा निवडणुकीत बाजी मारीत आपलाच राष्ट्रवादी पक्ष खरा असल्याचे दाखवून दिले.
लोकसभेनंतर विधानसभेला राष्ट्रवादी पक्षच बाजी मारणार अशी वातावरण निर्मिती झाली. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सात मतदारसंघांत उमेदवार उभे केले. राजकारणात नवख्ये असलेले संदीप वर्पे, राणी लंके, अमित भांगरे, अभिषेक कळमकर या चार जणांना उमेदवारी दिली. त्यासाठी त्यांनी अकोले, कोपरगाव, नगर शहर, पारनेर, शेवगाव, राहुरी व कर्जत अशा सात मतदारसंघांत झंझावाती प्रचार केला. परंतु एकाही जागेवर यश आले नाही.
अकोले, कोपरगाव, नगर शहर व पारनेर या चार मतदारसंघांतील उमेदवारांविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांनी थेट लढत देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा पराभव केला.
या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा नव्हे तर अजित पवार यांचाच करिष्मा असल्याचे दिसून आले आहे.
40 वर्षांपासून जिल्ह्यावर होते वर्चस्व
1985 मध्ये शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे जिल्ह्यात दोन आमदार विधानसभेवर निवडून आले होते. वसंतदादा पाटीलांच्या निधनानंतर अनेक प्रस्थापितांनी पवारांचे नेतृत्व स्वीकारले. 1990 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नऊ तर 1995 मध्ये दहा आमदार विजयी झाले होते. 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पवारांबरोबर जात प्रस्थापित नेत्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली. त्यातून अनेक जण आमदार, खासदार, मंत्रीही झाले.