मालेगाव : बाह्य विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार दादा भुसे 1 लाख 4 हजार 200 मतांचे मताधिक्य घेत विजयी झाले. दुसर्या क्रमांकाची मते संपादन करणारे अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव यांना अनामत वाचवण्यात यश आले असून, त्यांनी तालुक्यातील आपले राजकीय वर्चस्व दाखवून दिले आहे, तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अद्वय हिरे यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्यासह 15 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली
बाह्य विधानसभा निवडणुकीत 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते, तरी भुसे, हिरे व बच्छाव यांच्यातच तिरंगी लढत रंगली होती. या निवडणुकीत पालकमंत्री भुसे यांनी 1 लाख 4 हजार 200 मतांचे मताधिक्य घेत विजय संपादन केला. बच्छाव यांना 51,678 मते मिळून ते दुसर्या क्रमांकावर, तर 39,843 मते मिळून हिरे तिसर्या क्रमांकावर फेकले गेले.
वैध मतांच्या एक षष्टमांश मतांपेक्षा अधिक मते मिळू न शकल्याने हिरे यांच्यासह राजेश मोरे, किरण मगरे, चंद्रकांत ठाकूर, प्रवीण ठोके, अबू गफार म. इस्माईल, उमर नूर मो., अंकुश भुसारे, कुणाल सूर्यवंशी, मोहंमद इस्माईल जुम्मन, मो. सऊद सुलतान अ., यशवंत खैरनार, रऊफ खान कदीर खान, राजाराम देशमुख, हर्षल भुसारे या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
तीन आकडी संख्या गाठण्यात अपयश
विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात विजयी झालेले शिवसेनेचे दादा भुसे यांना रमजानपुरा व म्हाळदे येथील 18 मतदान केंद्रांवर तीन आकडी मतसंख्या गाठता आली नाही. त्याचप्रमाणे अद्वय हिरे यांना तब्बल 198 मतदान केंद्रांवर, तर बंडूकाका बच्छाव यांनादेखील 124 मतदान केंद्रांवर तीन आकडी मतसंख्या गाठण्यासही यश आले नसल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. रमजानपुरा, म्हाळदे वगळता संपूर्ण मतदारसंघात वर्चस्व असल्याचे भुसे यांनी सिद्ध केले आहे.