Published on
:
27 Nov 2024, 1:47 am
Updated on
:
27 Nov 2024, 1:47 am
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात थंडीचा जोरदार कडाका जाणवू लागला आहे. गेल्या सात दिवसांपासून 17 अंशांच्या घरात असणारे किमान तापमान मंगळवारी 15.7 अंशांवर आले. तापमानातील घट यासोबतच बोचर्या वार्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा एक त दोन अंश कमी तापमान जाणवत होते. यामुळे सायंकाळनंतर शहरात फिरताना हुडहुडी भरवणार्या थंडीची अनुभूती होत होती.
यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच किमान तापमान 15.7 अंशापर्यंत घसरले. तापमानात मोठी घट झाल्याने मंगळवारी सायंकाळनंतरच शहरात कमालीची थंडी जाणवत होती. या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वेटर, जॅकेट, ऊबदार कपड्यांचा आधार घेतला होता. सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉकला जाणार्यांना तर थंडीने हुडहुडी भरलेली पाहायला मिळत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढू लागला आहे. ग्रामीण भागातील किमान तापमान शहराच्या तुलनेत घसरले आहे. यामुळे सायंकाळनंतर थंडीचा जोरदार कडाका ग्रामीण भागात जाणवत आहे. गेल्या सात दिवसांपासून कोल्हापुरात किमान तापमान 17 अंशांच्या घरात होते. गुरुवारी (दि. 21) व सोमवारी (दि. 25) तापमान 16.7 अंशांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी दैनंदिन सरासरी किमान तापमानात 2.1 अंशाची घट होऊन पारा 15.7 अंशांपर्यंत खाली आला होता. तर कमाल तापमानात 2 अंशाची घट होऊन पारा 28.2 अंशांवर आला होता. किमान व कमाल तापमानात घट झाल्याने थंडीची तीव—ता अधिक जाणवत आहे.