चिपळूण : वन अधिकार्यांनी टाकलेल्या धाडीत गोदामात आढळलेला खैराचा ज्युस. pudhari photo
Published on
:
27 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
27 Nov 2024, 12:30 am
चिपळूण : चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी खैर तस्करी प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली होती. यातील दोन संशयित नाशिकमधील होते. त्या अनुषंगाने नाशिक वन विभागाच्या अधिकार्यांनी खैर तस्करी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आज चिपळुणातील सावर्डे येथे धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात खैरसाठा तसेच खैराचा ज्युस आणि कात जप्त करण्यात आला. हे गोडावून नाशिक वन अधिकार्यांनी सील केले आहे.
नाशिक येथून खैर तस्करी करून त्यापासून खैराचा ज्युस आणि कात तयार केल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या हवेत येथे खैर तस्करी प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्ह्याचे धागेदोरे चिपळूणपर्यंत आले आहेत. त्यामुळे नाशिक वन विभागाने थेट चिपळूणकडे मोर्चा वळविला असून, आज दिवसभर ही धडक कारवाई करण्यात आली आहे. नाशिक वन पथकाचे पंधरा अधिकारी व कर्मचारी चार वाहनांतून चिपळुणात आले व सिंडीकेट फूड्स, कुंभारवाडा सावर्डा येथे ही धाड टाकण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी या उद्योगाचे संचालक उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिकार्यांनी तेथील कागदपत्रे, पुस्तके, वाहतूक पास आदी चौकशीकरिता जप्त केले. तसेच खैराचा ज्युस, रेडीमेड कात निदर्शनास आल्यावर नाशिकमध्ये खैराची अवैध लाकूडतोड करून त्यापासून ते बनविण्याचा संशय अधिकार्यांना आला आणि त्यांनी हे गोडावून सील केले आहे.
या प्रकरणी संबंधितांचा शोध घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवादी कारवाया करणार्या संस्थेबरोबर संबंध असणार्या एकाला सावर्डे येथून दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. यामध्ये सहा संशयितांचा समावेश होता. यातील दोघे नाशिकमधील होते. त्यामुळे नाशिक येथील वन विभागाने या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी ही कारवाई सुरू केली आहे.
या कारवाईमध्ये अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, मुख्य वनसंरक्षक रामानुजन (कोल्हापूर), नाशिकचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारी, वन परिक्षेत्र अधिकारी सविता पाटील, वनपाल दुसानी व अन्य वन कर्मचार्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. वन्यजीव रक्षक रोहन भाट्ये यांनी यासाठी मोठी मदत केली. याबाबत अधिक तपास वन अधिकारी करीत आहेत. या अचानक पडलेल्या धाडीमुळे सावर्डे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अजूनही हे पथक सावर्डेमध्ये असून या प्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे.