खा. सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात आघाडी भुईसपाटpudhari
Published on
:
27 Nov 2024, 2:35 am
Updated on
:
27 Nov 2024, 2:35 am
Political News: खा. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. महाविकास आघाडीचा एकही आमदार निवडून आला नाही, उलट दोन विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागल्याने आता या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा एकही आमदार उरलेला नाही. त्याचे दूरगामी पडसाद आगामी काळात पडलेले पाहायला मिळतील.
या निवडणुकीत बारामती, इंदापूर, दौंड, खडकवासला या मतदारसंघांत सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला; तर भोर आणि पुरंदर मतदारसंघात मित्रपक्ष काँग्रेसचे विद्यमान आमदार पराभूत झाले. खा. सुळे यांना आपल्या मतदारसंघात एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. आगामी निवडणुकांत या पराभवाचा प्रभाव पडून सुळे यांच्या राजकीय महत्त्वालाच आव्हान मिळू शकते.
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसेच साखर कारखान्यासारख्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सुळे यांच्या निर्णयाला किती महत्त्व राहणार याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांच्यासह ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे ’होमग्राऊंड’ असताना या मतदारसंघात एकही आमदार विजयी झाला नाही, हा सुळे आणि पवार यांच्या राजकीय नेतृत्वालाच मोठा धक्का आहे.
बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघांचा बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. विशेष म्हणजे या सहापैकी खडकवासला वगळता अन्य पाचही मतदारसंघांतून सुळे यांना लोकसभेला मताधिक्य मिळाले होते, परंतु आता या सहाही ठिकाणी महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सुळे यांची खडकवासल्यात 20 हजार 746 मतांनी पिछेहाट झाली होती. तिथे आता महायुतीचे भीमराव तापकीर हे 52 हजार 322 मतांनी विजयी झाले आहेत.
दौंडमधून सुळे यांना 26 हजार 337 मताधिक्य मिळाले होते. तेथे अॅड. राहुल कुल हे 13 हजार 906 मतांनी विजयी झाले आहेत. इंदापूरातून सुळे यांना 25 हजार 951 मताधिक्य मिळाले होते. तेथे दत्तात्रय भरणे हे 19 हजार 156 मतांनी विजयी झाले आहेत. पुरंदरला लोकसभेवेळी काँग्रेसचे संजय जगताप आमदार होते. तेथून सुळे यांना 35 हजार 281 मताधिक्य मिळाले होते. आता तेथे महायुतीचे विजय शिवतारे हे 24 हजार 180 मतांनी विजयी झाले आहेत.
भोरमध्ये लोकसभेवेळी काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार होते. तेथून सुळे यांना 43 हजार 805 मताधिक्य मिळाले होते. तेथे आता शंकर मांडेकर हे 19 हजार 435 मतांनी विजयी झाले आहेत. बारामतीच्या ’होम ग्राऊंड’वर अजित पवार यांचा दबदबा असताना आणि सुळे यांच्याविरोधात पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे आव्हान असताना सुळेंना 47 हजार 381 मताधिक्य मिळाले होते. विधानसभेला इथे अजित पवार हे 1 लाख 899 मतांनी विजयी झाले आहेत.
बारामती, इंदापूर या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सरळ सामना होता, परंतु त्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या उमेदवारांवर मात केली. बारामतीत तर खुद्द अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी उभे केले होते, त्यांचा दणदणीत एक लाखाहून अधिक मतांनी अजित पवार यांनी पराभव केल्याने बारामती या स्वत:च्या गावातीलच सुळे आणि शरद पवार यांच्या प्रभावाला आव्हान मिळाले आहे.
इंदापूरमध्ये तर वीस वर्षे मंत्रिपदी राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी राज्यात व्यस्त असतानाही दोन सभा घेतल्या होत्या, तरीही त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सलग तिसर्यांदा अस्मान दाखविले.
भोर मतदासंघात सुळे यांना लोकसभेला बारामतीखालोखाल मताधिक्य देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार संग्राम थोपटे यांना पराभव स्वीकारावा लागला, पुरंदर-हवेलीतही काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. या सर्वच उमेदवारांना सुप्रिया सुळे किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या करिश्माचा काहीच फायदा झाला नाही, असे दिसून आले आहे.आयात उमेदवार देखील झालेत पराभूत
सहाही विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली ही स्थिती सुळे यांच्यासाठी प्रतिकूल मानली जात आहे. लोकसभेची जागा सेफ व्हावी यासाठी विधानसभेच्या तोंडावर इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तर दौंडला माजी आमदार रमेश थोरात यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घेण्यात आले होते. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी खा. सुळे यांचा मार्ग सुकर व्हावा हा हेतू त्यामागे ठेवला होता. परंतु तरीही बारामती लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा महायुतीने खेचल्या आहेत.