वेंगुर्ले : एसटी आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करताना वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर. सोबत ग्रामस्थ, महिला. pudhari photo
Published on
:
27 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
27 Nov 2024, 12:30 am
वेंगुर्ले ः वेंगुर्ले-वायंगणी एसटी बस फेर्या बंद केल्याने वायंगणी ग्रामस्थांनी आक्रमक होत एसटी डेपोला धडक देत आगार व्यवस्थापकांना जाब विचारला. मार्गावरील एसटी बस फेर्या सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच व ग्रामस्थांतर्फे देण्यात आला.
वायंगणी गावात दीड महिन्यापूर्वी एमएसईबीचे वीजवाहिन्या अंडरग्राउंडचे काम सुरू होते. यासाठी रस्त्यालगत चर खोदाई केल्याने गावातील एसटी फेर्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाल्या नंतर सरपंच व ग्रामस्थांनी वेंगुर्ले एसटी आगाराला भेट देत याची माहिती देत एसटी फेर्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावेळ 18 नोव्हेंबर पासून वायंगणी गावातील एसटी फेर्या पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे वेंगुर्ले आगारा व्यवस्थापकांनी ग्रामस्थांना सांगितले होते. त्यानुसार 18 नोव्हेंबर पासून वेंगुर्ले- वायंगणी एसटी फेर्या सोडण्यात आल्या. मात्र, एसटी चालकांनी गावातील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा असल्याचा रिपोर्ट दिल्याने केवळ दोन दिवसात या एसटी फेर्या बंद करण्यात आल्या.
एसटी चालकांच्या अहवालावर आपण एसटी फेर्या कश्या बंद केल्या, असा सवाल सरपंच अवी दुतोंडकर यांनी आगार व्यवस्थापकांना केला. गावातील एसटी फेर्या बंद असल्याने ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी वायंगणी गावातील बसफेर्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली. रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी व इतर अडथळे असल्यास ते दूर करण्यासाठी ग्रामस्थ सहकार्य करतील, अशी ग्वाही सरपंच अवी दुतोंडकर यांनी एसटी अधिकार्यांना दिली. यावर आम्ही रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी करू व रस्त्यावरील अडथळे दूर झाल्यानंतर गावातील एसटी सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे आश्वासन आगार व्यवस्थापकानी दिले. सरपंच दत्ताराम ऊर्फ अवी दुतोंडकर, ग्रा. पं. सदस्य अनंत केळजी, विद्या कांबळी, दीपाली नांदोसकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.