Published on
:
27 Nov 2024, 12:15 am
Updated on
:
27 Nov 2024, 12:15 am
वैभववाडी ः आखवणे भोम पुनर्वसन गावठाणात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून वारंवार नागरिकांना त्याचे दर्शन घडत आहे. अनेक पाळीव कुत्रे तसेच शेळ्या त्यांनी फस्त केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
अरुणा धरण प्रकल्पतील धरणग्रस्तांचे मांगवली, कुसूर, उंबर्डे येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या पुनर्वसन गावठाणात गेले काही महिने वारंवार गावठाणातील नागरिकांना बिबटया द़ृष्टीस पडत आहे.अनेकांचे पाळीव कुत्रे या बिबट्याने फस्त केले आहेत.
सोमवारी सायंकाळी नागपवाडी गावठाणात बिबट्या फिरताना येथील एका घरासमोर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चार दिवसांपूर्वीही त्याच सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावरून बिबट्याचा गावठाणात मुक्त संचार सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा. तसेच पुनर्वसन विभागाने पुनर्वसन गावठाणात सीसीटीव्ही बसवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.