सागर बंगल्यावर आ. देवेंद्र फडणवीस यांनी आ. महेश शिंदे यांचा सत्कार केला.Pudhari Photo
Published on
:
27 Nov 2024, 12:28 am
Updated on
:
27 Nov 2024, 12:28 am
सातारा : विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असताना जनतेच्या विश्वासाच्या आणि विकासकामांच्या बळावर तुम्ही मोठ्या मताधिक्क्याने पुन्हा आमदार झाला आहात. जनतेची नाळ तुम्हाला योग्य पध्दतीने कळली आहे. हा विकासाचा वारु आपण एकदिलाने पुढेही सुरु ठेवूया, महेशराव... तुमच्या लढवय्येगिरीचे कौतुक वाटले, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. महेश शिंदे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दुसर्यांदा आमदार झालेल्या आ. महेश शिंदे यांनी मुंबई येथे सागर बंगल्यावर जाऊन आ. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आ. फडणवीस यांनी त्यांचा सत्कार करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे माजी जलसंपदामंत्री तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हेविवेट नेते आ. शशिकांत शिंदे यांचा दुसर्यांदा पराभव करून महेशराव तुम्ही बाजी मारली आहे. गतनिवडणुकीच्या तुलनेत मताधिक्क्यात फार मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या दृष्टिने तुमचे यश हे फार अमूल्य असे आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधकांकडून अनेक फेक नॅरिटिव्ह पसरवण्यात आले होते. मात्र, जनतेने विरोधकांच्या आरोपांवर विश्वास ठेवला नाही. महेशराव तुमची जिद्द वाखणण्याजोगी आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची व्याप्ती फार मोठी आहे. या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम तुम्ही करत आहात. महेशराव आपल्याकडे विकासाची निश्चित दिशा आणि दृष्टीदेखील आहे. मतदारसंघातील सर्वसामान्यांशी आपण नाते जपले आहे. तसेच विकासाची गंगा गावोगावी पोहचवण्यासाठी आपण झटत आहात. कोरोना काळामध्ये मतदारसंघातील जनतेचे हाल होऊ नयेत, म्हणून आपण स्वखर्चाने कोरोना सेंटर्स उभी केली. गोरगरिबांची पुण्याई आपल्याला मिळत असून हीच पुण्याई तुम्हाला आणखी मोठं करणार आहे, हे लक्षात ठेवा. जनतेसाठी असेच काम करत रहा. आपली लढवय्ये वृत्ती सोडू नका. राज्य आणि केंद्र शासनाची ताकद तुमच्या पाठिशी निश्चितपणे उभी केली जाईल, असेही आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले.