मुंबईला वेगवान बनवणाऱया कोस्टल रोडला आता मजबूत टेट्रापॉडची तटबंदी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सागरी जिवांचे संरक्षण तर होणारच आहे; पण त्यामुळे हा प्रकल्पही अधिक सुरक्षित होणार आहे. लवकरच टेट्रापॉडची ही तटबंदी उभारण्यात येणार आहे, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संकल्पना असलेला आणि मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे 93 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. कोस्टल रोडचे काम सुरू असताना प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क या मरीन ड्राईव्ह चौपाटीला जोडणाऱया किनाऱयाची धूप होऊ नये आणि कोस्टल रोडचेही संरक्षण व्हावे यासाठी या ठिकाणचे जुने टेट्रापॉड बदलून त्या जागी सुमारे 100 वर्षे टिकतील असे नवे टेट्रापॉड बसवण्यात येणार आहेत. आधीच्या टेट्रापॉडला 60 ते 65 वर्षे झाल्यामुळे हे जुने टेट्रापॉड बदलून त्या जागी मजबूत अशा टेट्रापॉडची आवश्यक आहे. याबाबत अहवाल मिळाला असून लवकरच हे टेट्रापॉड बसवण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
असे आहे टेट्रापॉडचे कार्य
भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी आत येऊ नये आणि किनाऱयाची धूप होऊ नये यासाठी मुंबईच्या चौपाटय़ांवर टेट्रापॉड बसवलेले असतात. मरीन ड्राईव्हच्या समुद्रातही असे टेट्रपॉड बसवलेले आहेत. मात्र, नव्या टेट्रापॉडमुळे कोस्टल रोडचा प्रकल्पही अधिक सुरक्षित होणार आहे.
n कोस्टल रोड हा 10.58 किलोमीटरचा आहे. यात दोन दोन किलोमीटरचे दोन महाकाय बोगदे आहेत. कोस्टल रोडची एक मार्गिका सी-लिंकला जोडली गेली आहे. दुसरी मार्गिकाही जानेवारीपर्यंत जोडली जाणार आहे. कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक काsंडी कमी होणार आहे.. या प्रकल्पामुळे 70 टक्के वेळ आणि 34 टक्के इंधनाची बचत होणार आहे.