श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रेनिमित्त उत्पत्ती एकादशीला राज्यभरातून आलेल्या सुमारे तीन-साडेतीन लाख भाविकांनी हरिनामाचा गजर करत आळंदीत ग्राम प्रदक्षिणा, इंद्रायणी नदीस्नान, टाळ-मृदंग, वीणांचा त्रिनाद करत साजरी केली. या वेळी ‘विठ्ठल विठ्ठल जयहरी… ज्ञानोबा-तुकोबा’च्या गजराने सारा परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता. भाविकांच्या गर्दीने इंद्रायणी नदी घाट व परिसरातील रस्ते फुलले होते.
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम…’ अशा हरिनाम गजरात प्रदक्षिणा मार्गावर भाविक चिंब झाले होते. टाळ-मृदंगांच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली. स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाने पहाट पूजेदरम्यान स्वच्छता सेवा रुजू केली. दरम्यान, घंटानाद होताच मंगलमय सनई-चौघडय़ांच्या वादनात मंदिरात पहाट पूजे वेळी 11 ब्रह्मवृंदांच्या वेद मंत्रोच्चारात पवमान अभिषेक झाला. माउलींच्या गाभाऱयात ‘श्रीं’च्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक पूजा झाली. यात दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावत पोशाखात केशरी मेखला, शाल, सोनेरी मुकुट ठेवताच ‘श्रीं ’चे आकर्षक रूप सजले. यात लक्षवेधी आभुषणे, सोने, चांदीची छत्र-चामरे, विविध लक्षवेधी रंगातील पोशाख बांधीत तुळशीहार, चाफ्यांच्या फुलांचा वैभवी हार अर्पण होताच ‘श्रीं ’चे वैभवी सजलेले रूप भाविकांनी आपल्या नेत्रात मन भरून साठविले. ‘श्रीं ’ची आरती होताच परंपरेने मानकरी आणि पदाधिकारी यांना देवस्थानतर्फे नारळ प्रसादाचे वाटप झाले.
यंदा माउलींच्या पहाट पूजेस बसण्याचा मान दर्शनबारीतील प्रथम वारकरी दाम्पत्य अलका लोखंडे व अशोक लोखंडे यांना मिळाला. आळंदी देवस्थानतर्फे ‘श्रीं’ची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. लोखंडे दाम्पत्य सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दर्शनबारीत उभे राहिले होते.
भाविकांनी घेतले समाधीचे दर्शन
आज लाखो भाविकांनी ‘श्रीं’चे समाधीचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी मंदिर प्रदक्षिणा करीत स्थान महात्म्य जोपासले. तसेच श्री संत नामदेवराय यांच्यासह श्री पांडुरंगराय यांच्या पालखीचे नदीलगत असलेल्या वासकर फड येथे जात ‘श्रीं ’च्या पालखीचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी दर्शनास वैतागेश्वर महाराज यांचे मंदिरामागील दर्शनबारीतून जात दर्शन घेतले.
पालख्या मिरवणुकी निघाल्या
‘श्रीं ’च्या नामजयघोषात राज्यातून आलेल्या दिंडय़ांनी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा केल्या. इंद्रायणी घाटावर स्नानास भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान, दिंडय़ादिंडय़ांतून खांद्यावर पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मृदंगाचे वाद्य वादनात इंद्रायणी नदी घाटावर भाविक वारकरी, महिला यांचे सांप्रदायिक खेळ रंगले. अनेक संतांच्या पादुकांच्या पालख्या मिरवणूक, नगरप्रदक्षिणा झाल्या. सर्वत्र शहरात ‘ज्ञानोबा माउली’चा व हरिनामाचा जयघोष सुरू असताना ‘श्रीं ’ची पालखी तसेच श्री नामदेवरायांची पालखीदेखील नगरप्रदक्षिणा मार्गावर हरिनाम गजरात आल्या. हजेरी मारुती मंदिरात परंपरेने थांबून अभंग, आरती होऊन ‘श्रीं ’ची पालखी मंदिरात पुन्हा प्रवेशली.