बंगळूर : संविधान कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार. Pudhari File Photo
Published on
:
27 Nov 2024, 12:05 am
Updated on
:
27 Nov 2024, 12:05 am
बंगळूर : कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे संकेत खुद्द प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले असून, त्यामुळे निष्क्रिय मंत्र्यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. ग्राम पंचायत अध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. त्याचधर्तीवर काही मंत्र्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे, असे उपमुख्यमंत्री शिवकुमारांनी म्हटले आहे. त्यामुळे जानेवारीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित आहेत.
पक्षाच्या कार्यालयात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात शिवकुमार बोलत होते. ते पुढे म्हणाले, सोनिया गांधी यांनी ग्रामपंचायत अध्यक्षपद तर सोडाच, पंतप्रधानपदाचा त्याग केला होता. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन काँग्रेसवासी वाटचाल करतात. ग्रामपंचायत अध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा करण्यात आला आहे. त्याच प्रकारचा निरोप काही मंत्र्यांना पाठवला आहे. एक वर्षानंतर ग्रामपंचायत अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हा संदेश कॅबिनेट मंत्र्यांनाही दिला आहे, असेही शिवकुमार पुढे म्हणाले. शिवकुमारांच्या वक्तव्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तथापि, अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ते पुढे म्हणाले, मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेबाबत मी काहीही सांगणार नाही. मला जेव्हा काही कळेल, तेव्हा मी बोलेन. याबाबत मुख्यमंत्री आणि आमच्या एआयसीसीचे सरचिटणीस यांना विचारावे.
हमी योजना कोणत्याही कारणास्तव बंद केल्या जाणार नाहीत. हमी योजनांच्या मुद्द्यावर विधान करणार्या आमदार गवियप्पा यांना काँग्रेस पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
हमी योजनांबाबत आम्ही राज्यातील जनतेला शब्द दिला आहे. कोणतीही परिस्थिती आली तरी त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही आमदाराला हमी योजनांबाबत प्रश्न पडू नये. तसे केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. अपात्र लोक त्याचा लाभ घेत असतील तर त्याची तपासणी करून दुरुस्ती केली जाईल, असे शिवकुमार म्हणाले.
म्हादई, काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी
म्हादई प्रश्नासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आणि त्या भागातील खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. याशिवाय झारखंडमध्ये होणार्या सोरेन मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. बेळगाव येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गांधीजींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. याला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.