Published on
:
27 Nov 2024, 1:43 am
Updated on
:
27 Nov 2024, 1:43 am
कोल्हापूर : देशातील विविध राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल, राजकीय पंडितांची भविष्यवाणी आणि राजकीय पक्षांचे स्वतःचेही अंदाज यांना संपूर्णतः चकवा देत महाराष्ट्रातील जनतेने मतांच्या त्सुनामीने महायुतीवर पाऊस पाडला. मतांच्या या तुफान वृष्टीमध्ये राज्यात सत्तेचा लगाम पकडू पाहणारे महाविकास आघाडीचे स्वप्न उद्ध्वस्त केले. नव्हे, महाविकास आघाडीच्या घटकपक्षांपुढे अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केला आहे. विशेषतः, राज्यातील काँग्रेसला नेतृत्वच नाही, अशी पोरकी अवस्था निर्माण झाल्याने परिपक्व लोकशाहीत दिशाभूल करणारे मुद्दे पुढे करून राजकारण करता येत नाही, असा इशाराच मतदारांनी मतपेटीतून महाविकास आघाडीला दिला आहे.
निवडणुकीला सामोरे जाताना त्यापूर्वी निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा उपयुक्त ठरते. त्यावर चिंतन झाले, कारणे शोधून उपायांची अंमलबजावणी झाली की, समोर आलेले युद्ध जिंकण्यासाठी मोठी मदत होते. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा अपेक्षाभंग झाला होता. सर्वात भरवशाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात महायुतीने मोठ्या प्रमाणात जागा गमावल्या. परिणामतः, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मोठी लोकप्रियता असूनही बहुमतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तेलगू देसम पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या कुबड्या घेणे भाग पडले होते. या निवडणूक निकालात कुठे कमी पडलो, याचे चिंतन राज्यातील महायुतीने केेले. जनलोकप्रिय घोषणांची परिणामकारक अंमलबजावणी सुरू केली. प्रामुख्याने ‘लाडकी बहीण’ योजनेची परिणामकारक अंमलबजावणी केली आणि जागावाटपातही समन्वय साधून एकदिलाने प्रचार यंत्रणा उभी केली. याचा उत्तम परिणाम निवडणूक निकालाच्या निमित्ताने पुढे आला आहे. यामध्ये अजित पवारांनी बारामतीचा गड राखत राष्ट्रवादी काँग्रेसवर हक्क कोणाचा, याचे खणखणीत उत्तर आपले चुलते शरद पवार यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या असलीपणावर जनतेचेच शिक्कामोर्तब करून घेतले आणि अभिमन्यूप्रमाणे विरोधकांनी चोहोबाजूंनी घेरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीने विरोधकांना चारीमुंड्या चीत करून अस्मान दाखविले.
बटेंगे तो कटेंगे... कामी आले
‘बटेंगे तो कटेंगे’ हे घोषवाक्य हिंदू मतांच्या मनामध्ये बिंबविण्यात महायुती यशस्वी ठरली. यामुळेच हिंदू मतदार प्रथमच हिरिरीने मतदान केंद्रांवर जाताना दिसले आणि दलित मतांसाठी मतदारसंघनिहाय व्यूहरचना आखण्यातही महायुती यशस्वी झाली. सोबतीला लाडकी बहीण होती. याचा एकत्रित परिणाम मतांच्या त्सुनामीमध्ये इतका झाला की, महाविकास आघाडी अंतर्गत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, निवडणुकीच्या रिंगणात भुईसपाट झाले.