महावितरणचा कनिष्ठ अभियंता, कंत्राटी तंत्रज्ञ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
परभणी (Parbhani Bribery Division) : विद्युत पुरवठा करणारे रोहित्र बंद पडल्याचे रिपोर्ट देण्यासाठी २० हजाराच्या लाचेची मागणी करत तडजोडी अंती १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन लाच घेतल्या प्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता, कंत्राटी तंत्रज्ञ यांच्यावर (Bribery Division) परभणी लाचलुचपत विभागाने मंगळवार २६ नोव्हेंबर रोजी कारवाई केली.
मोहमद तलहा मोहमद हिमायत कनिष्ठ अभियंता महावितरण ग्रामीण शाखा १ मानवत, महेश शिवरुद्र कोल्हेकर कंत्राटी तंत्रज्ञ महावितरण ग्रामीण शाखा १ मानवत असे लाचखोर लोकसेवकांची नावे आहेत. (Bribery Division) तक्रारदार यांच्या शेतातील बोअरवर विद्युत मोटार बसविलेली आहे. त्याला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र पावसाळ्या पासून बंद आहे. रोहित्र बंद असल्याचा रिपोर्ट मिळणे बाबत तक्रारदार याने मोहमद तलहा यांना विनंती केली.
यावर संबधीताने २० हजार रुपये लागतील असे सांगितले. तडजोडी अंती १५ हजाराची मागणी केली. ही रक्कम महेश कोल्हेकर यांच्याकडे देण्यास सांगितले. याबाबत परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली. महेश कोल्हेकर यांनी तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपये स्विकारले. त्याला लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. मोहमद तलहा यालाही ताब्यात घेण्यात आले असून मानवत पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही (Bribery Division) कारवाई पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक अलताफ अय्युब मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी येथील पथकाने केली.