Published on
:
26 Nov 2024, 11:17 am
Updated on
:
26 Nov 2024, 11:17 am
नाशिक : दिंडोरी पंचायत समितीतील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यास एसीबीने 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सुभाष हरिभाऊ मांडगे (४४, रा. कलानगर, म्हसरूळ) असे लाच घेणाऱ्या संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे.
कोशिंबे (ता. दिंडोरी) येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा सापळा रचला. तक्रारदारानुसार, २०२०-२०२१ ते २०२३-२०२४ या कालावधीत आयुर्वेदिक दवाखान्यासाठी शासनाकडून विविध कामांसाठी दोन लाख २७ हजार रुपयांचा निधी अनुदान स्वरूपात मिळाला. या खर्चाचे लेखापरीक्षण देखील झाले. तरीदेखील संशयित मांडगे यांनी २८ ऑक्टोबरला तक्रारदाराकडे अनुदानाच्या रकमेवर कमिशन स्वरुपात १० टक्के लाचेची मागणी केली. याविषयी संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. त्यानुसार सोमवारी (दि. २५) मांडगे याने कलानगर येथील निवासस्थानी तक्रारदाराकडून तडजोड करीत २० हजार रुपयांची लाच स्विकारली. त्यावेळी 'एसीबी'च्या पथकाने मांडगे यास रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली. मंगळवारी (दि. २६) मांडगे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास बुधवारपर्यंत (दि. २७) पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह पोलिस नाईक विनोद चौधरी, शिपाई अनिल गांगोडे व चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
सहकाऱ्यांकडेच लाच मागितली
संशयित मांडगे याने सहकारी अधिकाऱ्यांकडेच लाचेची मागणी केली. सहकाऱ्यांनी त्यास विरोध केला तरीदेखील तो लाचेसाठी आग्रही होता. त्यामुळे अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या या निर्णयामुळे लाचखोरांना धडा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.