परभणी/मानवत (Parbhani):- उघड्यावर शौचाला बसल्याने विविध आजाराचा सामना करावा लागतो हे टाळण्यासाठी शासनाने घरोघरी शौचालय (Toilet) बांधण्याचा निर्णय घेतला त्यासाठी हागणदारीमुक्त गावाचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार घरोघरी शौचालये बांधण्यात आली. त्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळाले. मात्र आज घडीला मानवत तालुक्यातील ग्रामीण भागात जनतेची मानसिकता बदलली नसल्याने आजही गावाबाहेर रोडवर शौचास बसत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
शौचालयाचा वापर होईना..!
मानवत तालुक्यातील ग्रामीण भागात हिस्त्र प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे बाहेर शौचास जाणे जिवावर बेतणारे ठरत असल्याने भीतीपोटी का असेना, शौचालयाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. मात्र ग्रामीण भागात शौचालयाचा वापर होत नसल्याने गावाबाहेर असलेल्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पाहवयास मिळत आहे. त्यामुळे शासनाच्या हगणदारीमुक्तीचे स्वप्न नागरिकाच्या उदासीनतेमुळे भंगत असल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्याच्या दृष्टीने तसेच विशेषता महिलांच्या सोयीसाठी ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला होता या निर्णयाला केंद्र शासनासोबत (Central Govt) राज्य सरकारनेही पाठबळ दिले होते. त्यामुळे शौचालयाचे महत्व नागरिकांनाही कळाले होते यासाठी पंचायत समिती स्तरावर शौचालय बांधण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय अमलात आणण्यात आला.
हागणदारीमुक्त गावाची संकल्पना ही लोकचळवळ होण्याची गरज होती
ग्रामपंचायत स्तरावर विविध पुरस्कार मिळत असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधी देखील जोमाने कामाला लागले होते. परंतु नऊ दिवस नवलाईचे या युक्तीप्रमाणे काही दिवस याचा परिणाम जनमानसात टिकून राहिला. हागणदारीमुक्त गावाची संकल्पना ही लोकचळवळ होण्याची गरज होती. मात्र पुरस्कारापुरती निर्माण झालेली चढाओढ फार काळ टिकू शकली नाही. संपूर्ण मानवत तालुका हागणदारीमुक्त दाखवायचे असल्याने कागदावरच हागणदारीमुक्त गाव रेखांकित करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या हागणदारीमुक्त गावाची संकल्पना आजही मानवत तालुक्यात साकारली नसल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.