निवडणुकीनंतरही महापालिका कार्यालयात शुकशुकाटFile Photo
Published on
:
26 Nov 2024, 11:12 am
Updated on
:
26 Nov 2024, 11:12 am
Pimpri News: विधानसभा निवडणुकीच्या कामावर नियुक्तीवर असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी याकाळात व्यस्त होते. निवडणूक संपून आता आचारसंहिताही संपली आहे. मात्र महापालिकेचे हे अधिकारी, कर्मचारी अद्यापही कामावर रूजू झालेले नाहीत. त्यामुळे महापालिका भवन तसेच, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कर्मचार्यांची संख्या तुरळक असल्याने शुकशुकाट दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून अशी परिस्थिती आहे.
महापालिकेचे तब्बल चार हजार अधिकारी आणि कर्मचारी हे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कामासाठी नेमण्यात आले होते. त्यांना निवडणुकीच्या विविध विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
निवडणुकीसाठी महापालिकेच्या तब्बल 3 हजार 962 अधिकारी आणि कर्मचार्यांनी काम केले. त्यामध्ये वर्ग दोन व तीनचे दोन हजार 352 अधिकारी व कर्मचारी आहेत. वर्ग चारचे एक हजार 610 कर्मचारी होते. पीआरओ, एफपीओ, ओपीओ, बीएलओ, झेडओ, एमओ विभागात एकूण एक हजार 215 कर्मचारी तैनात होते.
चिंचवड मतदारसंघासाठी एक हजार 140 अधिकारी व कर्मचारी, पिंपरी मतदारसंघासाठी एक हजार 419 अधिकारी व कर्मचारी आणि भोसरी मतदारसंघासाठी एक हजार 8 कर्मचार्यांनी काम केले. अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर असल्याने, महापालिका व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ते येत नसल्याने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकार्यांची कामे रखडली आहेत.
फोन केल्यानंतर इलेक्शन ड्युटीवर असल्याची उत्तरे दिली जात होती. आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू झाली होती. मतमोजणीनंतर निकाल शनिवारी (दि.23) जाहीर झाला आहे. आचारसंहिता उठली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजातील अधिकारी व कर्मचार्यांनी पुन्हा कामावर रूजू होणे अपेक्षित होते. त्यामुळे सुमारे दीड महिन्यांपासून कामे तुंबून राहिली आहेत. निवडणूक संपूनही अधिकारी व कर्मचारी भेटत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
पुढील महिन्यापासून कामकाज सुरळीत होण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी(दि.23) लागला. त्यानंतर सोमवार(दि.25) पासून अधिकारी व कर्मचारी महापालिका व क्षेत्रीय कार्यालयात रूजू होऊन दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू होईल, असे अपेक्षित होते. मात्र, अधिकारी व कर्मचार्यांना शुक्रवार(दि.29) पर्यंत रजा घेतल्या आहेत. त्यामुळे पुढील सोमवार(2 डिसेंबर) पासून सर्व अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होऊन महापालिकेचे कामकाज नव्या दमाने सुरू करतील, असे अधिकार्यांनी सांगितले.