Published on
:
26 Nov 2024, 7:18 am
Updated on
:
26 Nov 2024, 7:18 am
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात भाजपने यंदा सहा जागांवर निवडणूक लढविली. यात पाच जागांवर विजय मिळविला. २०१९ च्या तुलनेत या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची १ लाख ६० हजार ६८ मते वाढली आहेत. यंदा सोलापूर शहर मध्यची जागा लढून ती जिंकली, पण, माळशिरसमध्ये पक्षाला पराभव पत्करावा लागला.
सन २०१९ मध्ये भाजपने पाचही मतदारसंघात ४ लाख ८३ हजार ११३ मते मिळविली होती. यंदा सहा मतदारसंघात ६ लाख ४३ हजार १८१ मते मिळाली आहे. २०२४ च्या लोकसभेत भाजपला ५ लाख ४९ हजार २८ मते मिळाली होती. लोकसभेच्या तुलनेत ९७ हजार १५३ मते जादा मिळाली आहेत.
२०१९ मध्ये अवकलकोटमध्ये भाजपला १ लाख १९ हजार ४३७ मते मिळाली होती. यंदा विधानसभेला भाजपला १ लाख ४८ हजार १०५ मते मिळाली आहेत. सोलापूर शहर उत्तरमधून २०१९ मध्ये भाजपला ९६ हजार ५२०, तर यंदा १ लाख १७ हजार २९५ मते मिळाली. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजपला तब्बल एक लाख नऊ हजार १९५ मते मिळाली.
२०१९ च्या विधानसभेला भाजपला ८७ हजार २२३ मते मिळाली होती, गंदा विधानसभेला तब्बल १ लाख १६ हजार ९३२ मते मिळाली. माळशिरसमध्ये सन २०१९ च्या विधानसभेला १ लाख ९३ हजार ५०७ मते मिळवून भाजपने मुसंडी मारली.
पोटनिवडणुकीपेक्षा आवताडेंना जास्त मते
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसचे भारत भालके आणि भाजपकडून सुधाकर परिचारक यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी समाधान आवताडे हे अपक्ष लढले होते. यात भाजपचे परिचारक यांचा पराभव झाला, त्यांना ७६ हजार ४२६ मते मिळाली होती. भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर २०२१ मध्ये पोटनिवडणूक झाली. यावेळी परिचारक आणि आवताडे गट एकत्रित येऊन समाधान आवताडे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली. आवताडे यांना एक लाख नऊ हजार ४५० मते मिळाली. यंदा याच मतदारसंघात आवताडे यांना १ लाख २५ हजार १६३ मते म्हणजे पोटनिवडणुकीपेक्षा १५ हजार ७१३ मते अधिक मिळाली.