रायगड – महाडकडून मुंबईकडे येत असताना मुंबई – गोवा मार्गावरील वावे दिवाळी गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावर नदीच्या पात्रात कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबई – गोवा मार्गावरील इंदापूर वावे दिवाळी गावाजवळ काल सायंकाली उशीरा हा अपघात घडला आहे. या अपघाता पती-पत्नीचा जागी मृत्यू झाला असून क्रेनच्या सहाय्याने नदीतून कार बाहेर काढण्यात आली आहे. राज्यात सोमवार पासून घडलेले विविध चार अपघातात चार जण ठार तर पन्नासहून अधिक जण जखमी झालेले आहेत.
मोटर सायकलीच्या धडकेत दोन ठार
गोंदिया तालुक्यातील रावणवाडी – अर्जुनी दरम्यान रस्त्यावर दोन मोटार सायकलीच्या जोरदार धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मोटरसायकलीवर एकूण पाच प्रवासी प्रवास करीत होते. दोघांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलेले आहे.
बस कलंडून वऱ्हाड जखमी
लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या खासगी बसचा अपघात होऊन नवरदेवासह 40 ते 45 वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना नाशिक येथील मनमाड – मालेगाव महामार्गावरील चोंडी गावाजवळ सोमवारी रात्री घडली आहे. संगमनेरकडून – राजस्थानला ही बस निघाली असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कलंडली . त्यात नवर देवासह 45 जण किरकोळ जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चोंडी गावाच्या ग्रामस्थांनी मदतकार्य राबवून जखमी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
कंटेनरच्या धडकेने पन्नास फूटी हायमास्ट कोसळला
एका भरधाव कंटेनरने हायमास्ट दिव्याला जोरदार धडक दिल्याने पन्नास फूटाचा हा हायमास्ट दिव्याचा खांब कोसळल्याची घटना बदलापुरातील घोरपडे चौकात कल्याण-कर्जत मुख्य रस्त्यावर सोमवारी पहाटे घडली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने कोणी जखमी झालेले नाही.चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून या अपघाताची तीव्रता जाणवत आहे.