Published on
:
26 Nov 2024, 11:23 am
Updated on
:
26 Nov 2024, 11:23 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2025 RCB Captain : IPL 2025 चा मेगा लिलाव संपला आहे. आता सर्व फ्रँचायझी संघ पुढील हंगामासाठी सज्ज झाले आहेत. आयपीएल चाहतेही या हंगामाची आतुरतेने वाट पाहत होते. आता चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र अजूनही काही संघांच्या कर्णधाराबाबत सस्पेन्स कायम आहे. यामध्ये आरसीबीचाही समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच आरसीबीचा पुढचा नवा कर्णधार कोण असेल हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या शर्यतीत तीन मोठी नावे समोर येत आहेत. मात्र या तिघांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातो हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.
RCBचे 22 खेळाडूंचे पथक तयार
यंदाच्य मेगा लिलावात आरसीबीने एकूण 22 खेळाडूंना खरेदी केले आहे. त्यांना 25 खेळाडूंचा संघात समावेश करता आला असता, पण व्यवस्थापनाला त्याची गरज भासली नसावी. या संघाने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल या खेळाडूंना कायम ठेवले होते. तर लिलावादरम्यान त्यांनी अनेक बलाढ्य खेळाडूंना खरेदी केले आहे. पण खरेदी करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये कोणी कर्णधार आहे का, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. गेल्या वर्षीपर्यंत संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसिसच्या हाती होती, मात्र यंदाच्या हंगामापूर्वी त्याला फ्रँचायझीने रिलीज केले. त्यानंतर लिलावार फाफका दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे.
विराट कोहली पुन्हा होणार RCBचा कर्णधार?
आरसीबीच्या नवीन कर्णधाराच्या शर्यतीत विराट कोहलीचे नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे तो यापूर्वी संघाचे नेतृत्व करत होता, पण तो काही वर्षांपूर्वी स्वतःहून या पदावरून पायौतार झाला होता. आता त्याला पुन्हा कर्णधार व्हायचे असेल तर त्यात फ्रँचायझी व्यवस्थापनाची आडकाठी नसेल. कोहलीला आरसीबीने 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. यंदाचा हंगाम सुरू व्हायला अजून बरेच महिने बाकी आहेत. त्यामुळे आरसीबी व्यवस्थापनाकडे याबाबत विचार करायला वेळ आहे.
कोहलीशिवाय संघाकडे कर्णधारपदाचा एक पर्याय आहे. या लिलावात संघाने इंग्लंडच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या फिल सॉल्टला 11 कोटींहून अधिक रकमेत विकत घेतले आहे. यापूर्वी तो केकेआरकडून खेळत होता. केकेआरला जेतेपद मिळवून देण्यात फिल सॉल्टची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. फिल सॉल्ट हा देखील आरसीबीच्या कर्णधारपदाचा दावेदार आहे. इंग्लंडचा पुढचा कर्णधार म्हणून त्याच्याचे नाव चर्चेत आहे. त्याने आतापर्यंत दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लिश संघाचे संघाचे नेतृत्व केले आहे. हे दोन्ही सामने जिंकण्यात संघाला यश आले आहे. अशा स्थितीत तो कर्णधारपदासाठी दावेदार असल्याचे समजते आहे.
लियाम लिव्हिंगस्टन एक पर्याय?
आरसीबीच्या कर्णधारपदासाठी आणखी एक दावेदार आहे, ज्याचे नाव आहे लियाम लिव्हिंगस्टन. यापूर्वी तो पंजाब किंग्जकडून खेळत होता. मेगा लिलावात त्याला आरसीबीने 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले. तो संघासाठी फिनिशर आणि अष्टपैलूची भूमिका साकारताना दिसणार आहे. लिव्हिंगस्टनने इंग्लंडसंघासाठी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदही भूषवले आहे. यापैकी एक सामना संघाने जिंकला असून दोन सामने गमावले आहेत. पण आरसीबी संघ लियामकडे आपला नवा कर्णधार म्हणून पाहतोय का? हा प्रश्न आहे. याचे उत्तर येणा-या काळातच समजेल.