लंघेंचे आमदारकीचे स्वप्न 20 वर्षांनी पूर्ण Pudhari
Published on
:
26 Nov 2024, 9:06 am
Updated on
:
26 Nov 2024, 9:06 am
Nevasa News: तालुक्याची आमदार बदलण्याची परंपरा कायम राहिली असून, नवनिर्वाचित आ. विठ्ठलराव लंघे यांचे 20 वर्षांनी आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत लंघे यांनी तिरंगी झालेल्या लढतीत दोन्ही विरोधी उमेदवारांना पराभवाची धूळ चारत 4021 मतांनी विजय संपादन केला.
मतमोजणीनंतर हजारो कार्यकर्त्यांनी गावागावांत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. सन 2004ला लंघे यांचा 804 मतांनी निसटता पराभव झाला होता. सन 2009च्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध जवळपास 22 हजार फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता 2024ला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. सकाळी 8पासूनच मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोस्टल मतदानात लंघे पिछाडीवर होते. त्यानंतर मतपेटीच्या 20 फेर्यांच्या मतमोजणीत लंघे आघाडीवरच होते.
शिरसगावात एका महिन्यात तिसर्यांदा दिवाळी!
निवडणूक प्रकिया सुरू झाली तेव्हा दिवाळी सुरू होती. त्यातच लंघे यांना आश्चर्यकारकरीत्या शिवसेनेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून दिवाळी साजरी करण्यात आली आणि 23 नोव्हेंबर रोजी आमदारकीच्या गुलालाबरोबरच संपूर्ण गावाने दिवाळी साजरी केली.
वडिलांच्या पुण्याईने, साधूसंतांच्या आशीर्वादाने मायबाप जनतेने केलेले उपकार विसरणार नाही, असे भावनिक उद्गार काढत जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळाली असून त्याचे नक्की सोने करील.
- आ. विठ्ठलराव लंघे, नेवासा