Published on
:
26 Nov 2024, 11:38 am
Updated on
:
26 Nov 2024, 11:38 am
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : यंदाची विधानसभेची निवडणूक माझी शेवटची निवडणूक होती. यापुढे मी निवडणूक लढणार नाही. पण सामाजिक, कामगारांसाठी काम करणार आहे. यापुढे नवीन नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष ज्याला संधी देईल, त्याच्यासाठी काम करणार असल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले. त्याचबरोबर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात आमच्या जवळच्या विश्वासू माणसांनी दिलेले मत आम्हाला मिळालेले नाही. त्यामुळे ईव्हीएम हॅक करून घोटाळा केल्याचा आक्षेप आडम (Narsayya Adam) यांनी नोंदवला.
सोलापूर शहर मध्य मतदासंघातील निवडणूक वैध नाही. यामध्ये ईव्हीएमचा घोटाळा झाला आहे. देवेंद्र कोठे यांनी माकपची, माजी आमदार नरसय्या आडम यांची बदनामी करून मतदारांना फसवले आहे. निवडणुक विभागही त्यांच्याबाजूने होता. त्यामुळे ही निवडणुक वैध नाही. ती रद्द करावी. फेरनिवडणूक घ्यावी. यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहे. जर तिथे दाद न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू अशी माहिती माकपचे सचिव उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी प्रचार करताना मंदिरात जावून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच रात्री त्यांना जेवण दिले. प्रचार संपल्यानंतर मतदारांना प्रलोभने दाखवून आकर्षित करण्यासाठी कमटम वसाहत येथील रायमलु कमटम यांच्या निवास्थानी जेवण दिले. तशी तक्रारी अॅड. अनिल वासम यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दिली होती. त्याचबरोबर मतदान होण्यापूर्वी रात्री अडीच वाजता माकपचा कोठे यांना पाठिंबा आहे. भाजपला मतदान करा. असा खोटा मजकूर, पत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले. ते पत्रक मतदान सुरू असताना दुपारी 1.30 वाजता व्हायरल होत होते. निवडणूक विभागास सांगूनही त्यांनी लवकर कारवाई केली नाही. निवडणूक विभागाने त्यांच्याबाजूने काम केल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस माजी आमदार नरसय्या आडम, जिल्हा सचिव अॅड. एम. एच. शेख, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, युसूफ शेख, व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, अॅड. अनिल वासम उपस्थित होते.