नागराज मंजुळे यांना न्यायालयाने बजावले समन्स:खाशाबा चित्रपटाची कथा वादाच्या भोवऱ्यात, लेखकानेच ठोकला कॉपीराइटचा दावा

3 hours ago 1
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील चित्रपटातील कथा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कथेचे मूळ लेखक हे संजय दुधाणे आहेत. त्यांच्याकडे पुस्तकाचे कॉपीराइट आहेत. त्यामुळे त्यांनी नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योति देशपांडे यांच्याविरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात कॉपीराइट भंगचा दावा दाखल केला आहे. लेखक संजय दुधाणे यांच्याकडे खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे 2001 पासून हक्क आहेत. तसेच भारत सरकारच्या कॉपीराइट कार्यालयाचे प्रमाणपत्र देखील दुधाणे यांच्याकडे आहे. चित्रपटाची निर्मिती व प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई व ठरावासाठी वकील रवींद्र शिंदे व सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यानुसार नागराज मंजुळे व ज्योती देशपांडे यांना जातीने हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत लेखक संजय दुधाणे यांनी गेल्या चार वर्षांत दोन बैठका घेतल्या, तसेच वकिलांसोबत समझोता बैठका अशा चार बैठकीत निर्णय झाला नाही. त्यामुळे दुधाणे यांनी कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याचा दावा दाखल केला. त्यानुसार आता मंजुळे यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. नेमके प्रकरण काय? खाशाबा चित्रपटाची मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असताना नागराज मंजुळे यांनी रणजीत जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. 2019 मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाबाबत खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी करार केला होता. मूळात रणजीत जाधव यांनीच 30 ऑगस्ट 2013 रोजी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन खाशाबांच्या चित्रपटाची कथा ही संजय दुधाणे यांची असल्याचे घोषित केले होते. मात्र, आता रणजीत जाधव यांनी संजय दुधाणे यांना डावलून संमती करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. संजय दुधाणे यांनी 2020 मध्ये रणजीत जाधव यांची भेट घेतली होती. त्यावेळी पटकथा लेखक तेजपाल वाघ हे देखील उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत लेखक म्हणून तुमचे नाव दिले जाईल व रणजीत जाधव यांच्याप्रमाणेच समान वाटा देऊन तुमचा मान राखला जाईल, असा शब्द नागराज मंजुळे यांनी संजय दुधाणे यांना दिला होता. या बैठकीनंतर सकारात्मक प्रतिसाद न आल्याने 26 डिसेंबर 2022 मध्ये संजय दुधाणे यांनी नागराज मंजुळे यांना नोटीस पाठवली. त्यानंतर कथालेखकाच्या वादामुळे हा चित्रपट मी करणार नाही असे मंजुळे यांनी रणजीत जाधवांना सांगितले होते. पुन्हा 5 जानेवारी 2023 रोजी रणजीत जाधव यांनी त्यांच्या व नागराज मंजुळे यांच्या वकिलांसोबत दुधाणे यांची भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली. दरम्यान, जिओ स्टुडिओने खाशाबा चित्रपटाची घोषणा केल्याने मंजुळे यांच्या पुण्यातील स्टुडिओमध्ये 8 जुलै 2023 रोजी रणजीत जाधव यांच्या वकिलासह एकत्रित समझोता बैठक घेतली. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते रणजीत चामले व पत्रकार विठ्ठल देवकाते उपस्थित होते. यावेळी संजय दुधाणे यांचे लेखक, संशोधक तसेच आभार प्रदर्शनात नाव देण्यात येईल व रणजीत जाधवांइतकेच मानधन देण्याचे ठरले होते. मात्र यावेळी नागराज मंजुळे आणि रणजित जाधव यांनी उदासीनता दाखवल्याने संजय दुधाणे यांनी नागराज मंजुळे व त्यांच्या आटपाट स्टुडिओला नोटीस पाठवली होती. यानंतर एका बड्या मध्यस्थीदारामार्फत नागराज मंजुळे यांचे वकील अ‍ॅड. रामकृष्ण कुलकर्णी यांनी सप्टेंबर 2024 मध्ये दोन वेळा प्रत्यक्ष भेटून समझोता करार लिहून आणला होता. तीन लाख रूपये देऊन पुस्तकाचे सर्व हक्क व चित्रपटाला ना हरकत देत आहेत, असे करारात लिहले होते. लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकाचे सर्व हक्क रणजीत जाधव यांना द्यावे, अशी देखील अट या करारात होती. ही अट मान्य नसल्याने अखेर संजय दुधाणे यांनी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली. खाशाबांच्या जीवनावरील एकमेव पुस्तक संजय दुधाणे यांनी खाशाबा जाधव यांच्यावर लहिलेले पहिलेच व एकमेव पुस्तक आहे. या पुस्तकासाठी खाशाबा यांच्या काळातील कुस्तीगीरांची भेट घेऊन परिपूर्ण माहिती एकत्रित केली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 2001 मध्ये पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाला 2008 मध्ये सर्वोत्कृष्ट क्रीडा पुस्तकाचा राज्यपुरस्कार मिळाला आहे. 2004 मध्ये इयत्ता 9 वी व 2015 मध्ये इयत्ता सहावी वीच्या पाठ्यपुस्तकात या पुस्तकातील पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकाच्या आधारे तेजपाल वाघ यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होतीे. त्याची पटकथा व संशोधन सर्व नागराज मंजुळे यांच्याकडे सुपूर्त केले होते. असे असताना तेजपाल वाघ व संजय दुधाणे या दोघांना अंधरात ठेवून मंजुळे चित्रपट निर्मिती करीत असल्याने हा वाद न्यायालयात पोहचला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article