गोंदिया (Gondia Election Results) : नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक विधानसभा २०२४ च्या निकाल जाहिर झाला असून जिल्ह्यातील नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना पसंती दर्शवित प्रतिनिधीत्वाची संधी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. महायुतीची सरकार राज्यात स्थापित होणार आहे. त्यामुळे महायुती सरकार मेहरबान होवून गेल्या ५ वर्षांपासून मंत्रालयापासून उपेक्षित असलेल्या जिल्ह्याला स्थान देणार का? याकडे लक्ष लागले आहे. चार आमदारांपैकी कुणाची लॉटरी लागणार, अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्याला पुन्हा मंत्री पदापासून वंचित तर ठेवले जाणार नाही? असा प्रश्नही निर्माण केला जात आहे.
जिल्ह्यातील चारही विधानसभा (Gondia Election Results) मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांनी मुसंडी मारली. अनपेक्षित निकाल अशी चर्चा सुरू असताना भाजप व महायुतीच्या समर्थकांकडून मात्र हे निकाल अपेक्षितच होते, असे बोलले जात आहे. चारही मतदार संघातून महाविकास आघाडी चारही मुंड्या चित्त झाली. महायुतीकडून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून राजकुमार बडोले यांना तिसर्यांदा प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली. तर तिरोडा मतदार संघातून महायुतीचे विजय रहांगडाले यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. गोंदिया मतदार संघात नवा इतिहास रचून विनोद अग्रवाल यांनी गेल्या ६२ वर्षात पहिल्यांदाच कमळ फुलविले आहे. त्याचप्रमाणे आमगाव मतदार संघातून महायुतीचे संजय पुराम यांना दुसर्यांदा प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली आहे.
जिल्ह्यातील चारही नवनिर्वाचित आमदार पक्ष संघटनात्मक कामगिरीत मजलेले खेळाडू आहेत. अर्जुनी मोरगावचे नवनिर्वाचित आमदार राजकुमार बडोले हे चार वर्ष कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. विशेष म्हणजे, गेले ५ वर्ष गोंदिया जिल्हा मंत्रालयापासून वंचित राहिला आहे. एवढेच नव्हेतर गेल्या ६२ वर्षात गोंदिया जिल्ह्याला फक्त ४ स्थानिक पालकमंत्री लाभले. त्यामुळे पाहुणे म्हणून येणार्या पालकमंत्र्यांच्या कामगिरीवर सातत्याने जिल्हा वासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात असते. अशात नव्याने स्थापित होणार्या महायुतीच्या सरकारात चारही चेहरे पक्षाचे निष्ठावान म्हणून मानले जातात. त्यामुळे (Gondia Election Results) गोंदिया जिल्ह्याला मंत्रालयात स्थान मिळेल काय? याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे कोणत्याही आमदाराची मंत्रालयात वर्णी लागणार, अशीही चर्चा सुरू झाली आहे. अशातच गोंदिया जिल्ह्याला मंत्रालयापासून यावेळीही डावलण्यात तर येणार नाही, अशीही शंका-कुशंका व्यक्त केली जात आहे.
सर्वच प्रवर्गातील आमदार तर मंत्रालय का नाही?
गोंदिया जिल्ह्यातील चार मतदार संघापैकी दोन मतदार संघ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. तर तिरोडा मतदार संघाचे ओबीसी प्रवर्गाचे विजय रहांगडाले तर गोंदिया मतदार संघाचे विनोद अग्रवाल हे सर्वसामान्य प्रवर्गातील आहेत. (Gondia Election Results) जिल्ह्यातील तीन आमदार महायुतीतील भाजप तर राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे भाजप किंवा राष्ट्रवादी कोट्यातून मंत्रीपद मिळेल, अशी प्रबळ अपेक्षा निर्माण झाली आहे.
हेवीवेट नेते खा.प्रफुल पटेलांकडे लक्ष
जिल्ह्यात महायुतीचे प्रमुख तथा वजनदार नेते म्हणून खा. प्रफुल पटेल यांना ओळखले जाते. राज्य व केंद्र सरकारात देखील खा. प्रफुल पटेल यांची भुमिका महत्वाची राहणार आहे. त्यामुळे हेवीवेट नेते खा.प्रफुल पटेल हे एक ना एक मंत्रालय गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला पाडतील, असा जिल्ह्यातील जनता व्यक्त करीत आहे. त्यामुळे खा. पटेलांच्या भुमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.