हिंदुस्थानात मागील काही महिन्यांमध्ये डिजिटल अटकेची धमकी देत अनेक नागरिकांना गंडा घातला आहे. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच मुंबईतील एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची डिजिटल अटकेची धमकी देत तब्बल 3.8 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तब्बल एक महिना हा सर्व प्रकार सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईमध्ये वास्तव्याला असणाऱ्या एका 77 वर्षीय वृद्ध महिलेला अनोळख्या नंबरवरून फोन आला. पोलीस असल्याचे सांगत त्यांनी महिलेला सांगितले की, तुमचे तैवानला पाठवण्यात आलेले पार्सल पकडण्यात आले आहे. तसेच यामध्ये पाच पासपोर्ट, कपडे आणि MDMA या नावाचे ड्रग्स आणि बॅंकेचे कार्ड असल्याचा दावा घोटाळेबाजांकडून करण्यात आला. तसेच पीडित महिलेच्या आधार कार्डचा तपशील यासाठी वापरण्यात आल्याच सांगण्यात आले. मात्र, हे सर्व आरोप फेटाळून लावत अशा पद्धतीचे कोणतेही पार्सल पाठवले नसल्याचे पीडित महिलने ठामपणे सांगितले. मात्र, घोटाळेबाजांनी महिलेचा काहीही न ऐकता तिला गुन्हे शाखेची बनावट नोटीस पाठवली.
नोटीस पाठवल्यानंतर पीडित महिलेला Skype हे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. तसेच आयपीएस अधिकारी आनंद राणा बोलत असल्याचे भासवत याबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीने पीडित महिलेला फोन करत फायनान्स डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच एक अकाउंट नंबर शेअर करत पैशांची मागणी केली आणि हा तपासाचा एक भाग असल्याचे सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेचा फोन 24 तास सुरू असायचा आणि फोन कट केल्यास घोटाळेबाज पुन्हा फोन करून महिलेला धमकवायचे. दरम्यानच्या काळात घाबरलेल्या पीडित महिलेने एकून 3.8 कोटी रुपये घोटाळेबाजांना पाठवले. सदर महिलने आपल्या मुलीला याबद्ल सांगितले आणि त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आाला. NDTV या वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.