विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेले उमेदवार सातत्याने प्रभावहीन ठरले आहेत.File Photo
Published on
:
26 Nov 2024, 2:33 pm
Updated on
:
26 Nov 2024, 2:33 pm
परभणी : २००९ पासूनच्या विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेले उमेदवार सातत्याने प्रभावहिन ठरले आहेत. एक अपवाद वगळता पाचअंकी आकडे देखील हे उमेदवार गाठू शकलेले नाहीत. बहुतांश वेळा डिपॉजिट जप्त होण्याची वेळ आली. यावेळी देखील मनसेने परभणी आणि गंगाखेड मतदारसंघात दिलेले उमेदवार अत्यंत तोकडी मते मिळवू शकल्याने जिल्ह्यात मनसे हा प्रभावहीन पक्ष ठरला आहे.
२००६ मध्ये राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर जिल्ह्यात असलेल्या समर्थकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. अनेकवेळा पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न देखील याठिकाणी झाला. मात्र संघटना फार मोठ्या प्रमाणावर विस्तार करू शकली नाही. सक्षम असे स्थानिक नेतृत्वच मनसेला मिळू शकले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेसह अन्य काही निवडणूकांत मनसेचे उमेदवार आपला प्रभाव दाखवू शकले नाहीत. दरम्यानच्या काळात संघटनात्मक बांधणीदेखील पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अधून-मधून येणारे कार्यकर्ते पदे मिळविण्यापुरतेच काम करीत असतात. त्यामुळे जिल्ह्यात मनसेचा प्रभाव दिसलाच नाही. फक्त काही छोट्या मोठ्या आंदोलनांतून पदाधिकारी झळकत असल्याचे दिसतात.
२००९ मध्ये मनसेने केवळ परभणी विधानसभा मतदारसंघात सुनिल देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना १८४१ मते मिळाली. २०१४ च्या निवडणूकीत संघटनेने मोठ्या प्रमाणावर तयारी करून चारही मतदारसंघात उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात जिंतूरमधून निवडणुकीपूर्वीच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने आपला अर्ज माघारी घेतला होता. त्यावर मोठी चर्चा झाली. परभणीत विनोद दुधगावकर यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यांना केवळ ४५४ मते मिळाली.
गंगाखेडमध्ये मात्र बाळासाहेब देसाई यांनी १७ हजार ८१६ अशी लक्षणीय मते मिळविली होती. हाच आजवरचा मनसेचा सर्वाधिक आकडा ठरला आहे. पाथरीमध्ये माजी आ. हरीभाऊ लहाने हे देखील १०१४ च्या निवडणूकीत आपला करीष्मा दाखवू शकले नाही. शिवसेनेकडून तब्बल ३ वेळा आमदारकी भुषविलेल्या लहाने यांना या निवडणूकीत केवळ ५५०९ मते मिळाली. २०१९ मध्ये मनसेने परभणी व गंगाखेडमध्ये उमेदवार दिले. परभणीत सचिन पाटील यांना केवळ १९१७ मते मिळाली. तर गंगाखेडमध्ये विठ्ठल जवादे यांना ४०७९ मते मिळाली.
मनसेने यावेळच्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा परभणी व गंगाखेडमधून आपल्या पदाधिकार्यांना रिंगणात उतरविले होते. परभणीत श्रीनिवास लाहोटी यांना केवळ ९८६ तर गंगाखेडमध्ये रूपेश देशमुख यांना २४७९ मते मिळाली. त्यामुळे या दोघांचेही डिपॉझीट जप्त होण्याची वेळ आली. आजवरच्या चारही निवडणूकीत मनसेचा प्रभाव जिल्ह्यात दिसूनच आला नाही.