मागील काही महिन्यांमध्ये रुग्णालयातून नवजात बाळांचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. असाच प्रकार आता कर्नाटकमध्ये घडला असून कलबुर्गी येथील सरकारी रुग्णालयातून एका नवजात बाळाचं अपहरण करण्यात आले आहे. नर्स बनून दोन महिलांनी रुग्णालयात प्रवेश करत रक्त तपासणीचे कारण देत बाळाचे अपहरण केले आहे. सदर घटना रुग्णालयातील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता घडली. जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक 115 मध्ये कस्तूरी नामक महिलेने एका बाळाला जन्म दिला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातवरण होते. मात्र, त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. बाळाचे रक्त तपासायचे आहे, अस कारण देत दोन महिला नर्सच्या वेशामध्ये आल्या आणि बाळाला घेऊन गेल्या. परंतु त्या महिला बाळाला घेऊन परत आल्या नाहीत. त्यामुळे बाळाचे वडील रामकृष्ण आणि आई कस्तूरी यांनी रुग्णालयात यासंदर्भात विचारणा केली असता त्यांना धक्काच बसला. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले असता दोन महिला नर्सच्या वेशामध्ये बाळाला घेऊन जात असताना दिसत आहेत. सदर घटनेची कुटुंबीयांना तत्काळ ब्रम्हपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.