संभाजीनगरमध्ये बोटाला शाई लावून पैसे:पोलिसांनी 18 लाख जमा केले अन् 2 कोटी सोडले -दानवे; अफवा पसरवण्याचा प्रयत्न - शिरसाट
3 days ago
2
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत बोटाला शाई लावून पैशांचे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोग व पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडली, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपानंतर स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना अंबादास दानवे यांनी रात्री उशिरा केलेल्या एका ट्विटमध्ये उपरोक्त आरोप केला. त्यात ते म्हणाले, छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. 'कर्तव्यदक्ष' जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे ते म्हणाले. आधार व इलेक्शन कार्ड जमा करून घेतले अंबादास दानवे यांनी मंगळवारी सकाळी एका पत्रकार परिषदेतही या आरोपांचा पुनरुच्चार केला. संभाजीनगरात शिंदे गट व भाजप विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांतील काही दलाल हाताशी धरून त्यांचे आधार कार्ड व निवडणूक ओळखपत्र जमा करून घेत आहेत. त्यांच्या बोटाला शाई लावायची आणि मतदान न करण्याच्या मोबदल्यात त्यांना पैसे दिले जात आहेत. या प्रकरणी मतदानासाठी वापरली जाणारी शाई बाहेर कशी येते? हा माझा पहिला प्रश्न आहे. हा प्रकार होत असताना पोलिस व निवडणूक आयोग आक्रमक कारवाई का करत नाही. यासाठी कार्यकर्त्यांना पोलिसांना भांडावे लागते. त्यानंतर कारवाईचे थोतांड केले जाते. त्यामुळे पोलिस यंत्रणा आरोपींना मदत करत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंबंधी निवडणूक आयोगही संशयाच्या भोवऱ्यात आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून पैशांचे वाटप होत असल्याचीही तक्रार केली आहे. संभाजीगरचे पोलिस आयुक्तही शिंदे गटाच्या सदर उमेदवारावर मेहेरबान असल्यासारखे वागत आहेत. तर आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करत आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा कायद्याचा भंगच करायचा असेल तर आमच्याकडूनही कुणी अपेक्षा करू नये. ही निवडणूक निष्पक्ष व शांततेत व्हावी अशी आमची मागणी आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. देवळाई तांडा भागातील व्हिडिओ व्हायरल आमदार संजय शिरसाट यांच्या कथित कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैशांचे वाटप केले जात असल्याचा एक व्हिडिओही संभाजीनगरमध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही कार्यकर्ते विद्यमान आमदाराला मतदान देण्याच्या मोबदल्यात पैसे घेत असल्याचे दिसून येत आहे. संजय शिरसाट यांनी फेटाळले आरोप दुसरीकडे, आमदार संजय शिरसाट यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत. विरोधकांकडून माझ्या मतदारसंघात अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांना आपला पराभव डोळ्यापुढे दिसत असल्यामुळे असे केले जात आहे, असे ते म्हणालेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)