संविधान निर्मितीमध्ये ब्राह्मणांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. संविधान मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी 3 जण ब्राह्मण होते, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांनी केले आहे. अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित संमेलनात ते बोलत होते.
संविधान निर्माते डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी भांडरकर संस्थेत म्हटले होते की, बी.एन. राव यांनी संविधानाचा मसुदा तयार केला नसता तर तो तयार होण्याआधी आणखी 25 वर्ष लागली असती, अशी आठवणही यावेळी Justice Krishna S Dixit यांनी सांगितली. संविधान मसुदा समितीतील 7 सदस्यांपैकी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अयंगार आणि बी.एन. राव हे तिघे ब्राह्मण होते. ब्राह्मण हा शब्द जातीशी न जोडता वर्णाशी जोडला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. ‘डेक्कन हेराल्ड‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
वेदांची रचना करणारे वेद व्यास हे मच्छीमाराचे पुत्र होते आणि रामायण लिहिणारे महर्षि वाल्मिकी हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे होते. ब्राह्मणांनी कधी त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले का? आपण शतकानुशतके प्रभू श्रीरामाची पूजा करत आलो असून त्यांची मुल्ये राज्यघटनेमध्येही समाविष्ट केलेली आहेत, असेही न्यायमूर्ती दीक्षित म्हणाले.