महायुतीच्या सरकारने जुलै महिन्यात जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अनेक अर्थांनी गाजत्ये. त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये सरकारतर्फे देण्यात येतात. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सराकर पुन्हा आलं तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासन अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलं होतं. नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचे निकाल लागले, महायुतील घवघवीत यश मिळालं, डिसेंबरमध्ये तर शपथविधी होऊन आता सरकारही व्यवस्थित कार्यरत आहे, मात्र महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील 2100 रुपयांच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल महिला विचारत असून एकेकाळी याच योजनेवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी आता याच मुद्यावरून सरकारला पुन्हा घेरल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याच मुद्यावरून ट्विट करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही ‘ असे म्हणत देशमुख यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहीलं आहे. छाननीच्या आडून लाडक्या बहीणींचे अर्ज रद्द करू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.
काय आहे अनिल देशमुख यांचं ट्विट ?
X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनिल देशमुख यांनी एक ट्विट करत सरकारला लाडकी बहीण योजनेवरून काही प्रश्न विचारले आहेत. ” राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.
लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन शासनाने तत्काळ पूर्ण करावे. छाननीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. असे झाल्यास आम्ही राज्यात मोठे आंदोलन उभे करू!” असा इशाराचा अनिल देशमुख यांनी दिला आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.
लाडक्या बहिणींना… pic.twitter.com/5B68pZQQJS
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 22, 2025
2100 रुपये कधी मिळणार ?
काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार का हे स्पष्ट होईल.