साखर देता का कुणी साखर..! आता शिक्षकांवर साखर गोळा करण्याची वेळFile Photo
Published on
:
01 Feb 2025, 4:46 am
Updated on
:
01 Feb 2025, 4:46 am
पुणे: पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शालेय पोषण आहारात गोड पदार्थ करून विद्यार्थ्यांना द्यायचे असतील तर शिक्षकांना लोकसहभागतून साखर गोळा करावी लागणार आहे. त्यासाठी कोणताही निधी शासन देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देण्यासाठी शिक्षकांना आता ‘साखर देता का कुणी साखर...’ अशी म्हणण्याची वेळ येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. यामध्ये तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीनुसार पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता.
परंतु विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे म्हणजेच तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती शासन निर्णय दि.11 जून 2024 अन्वये निश्चित करण्यात आली होती.
परंतु तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणार्या नागरी भागातील संस्था/बचत गट, योजनेंतर्गत कार्यरत असणार्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत. ही निवेदने व केंद्र शासनाने निश्चित केलेला प्रति दिन प्रती विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता आहार पध्दतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे 12 प्रकारच्या पाककृती विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या आहारात वैविध्यता आणण्याच्या द़ृष्टीने पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात. तसेच विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावेत.
पाककृतींमधील अंडा पुलाव व गोड खिचडी/नाचणी सत्व या पाककृती पर्यायी स्वरुपात देण्यात येत आहे. केंद्र शासनाने स्नेह भोजनाद्वारे योजनेंतर्गत लोकसहभाग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्यवस्थापन समितीने संबंधित दोन पाककृतीचा लाभ व अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा. याकरिता शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात येणार नाही.
योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत. त्यानुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्णय घ्यावा. तसेच, मुंबई महापालिका क्षेत्राकरीता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घ्यावा. प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच विद्यार्थ्यांना आहार देणे आवश्यक राहील, असे स्पष्ट केले आहे.
या 12 पाककृती तयार करण्यात येणार
1) व्हेजीटेबल पुलाव 2) मसाले भात 3) मटार पुलाव 4) मुगडाळ खिचडी 5) चवळी खिचडी 6)चणा पुलाव 7) सोयाबीन पुलाव 8)मसुरी पुलाव 9) मूग शेवगा वरण भात 10) मोड आलेल्या मटकीची उसळ 11) अंडा पुलाव 12) गोड खिचडी, नाचणी सत्व.
माध्यान्न जेवणामुळे उपस्थिती वाढत असल्याची नोंद अनेक ग्रामीण शाळांमध्ये झालेली आहे. पहिली ते आठवीच्या मुलांना शिक्षण हक्क अंतर्गत मोफत शिक्षण मिळते व नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे आता शाळकरी मुलांवर अधिक खर्च केला जाणार असे संगितले जात असले तरी साखरेसाठी लागणार्या खर्चासाठी सरकार हात आखडता घेत असल्याचे दिसत आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहे.
- मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी