सातारा विधानभा मतमोजणी कामकाजाचा निवडणूक निरीक्षक वंदना वैद्य यांनी आढावा घेतला. Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 12:33 am
Updated on
:
23 Nov 2024, 12:33 am
सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सातारा एमआयडीसीतील डीएमओ गोडावूनमधील मतमोजणी केंद्रात सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. या मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदारसंघाचा दुपारी 12.30 पर्यंत निकाल हाती येऊ शकतो, अशी माहिती सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली.
सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी एमआयडीसीतील मतमोजणी केंद्रातील मतमोजणी तयारीची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले, सातारा विधानसभा मतदानसंघाची मतमोजणी एमआयडीसीतील डीएमओ गोडावूनमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे 250 कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. मतदान यंत्रांसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असून सीसीटीव्हींचीही नजर आहे. मतमोजणी केंद्रावर मतमोजणी कर्मचार्यांना सकाळी 7.30 वाजता हॉलमध्ये मतमोजणीसाठी प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर स्ट्राँगरूममधून 464 मतदान यंत्रे मतमोजणी हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत. 464 मतदान केंद्रांवरील मतमोजणी 20 टेबलवर होणार आहे. 2 हजार 600 पोस्टल बॅलेट प्राप्त झाले आहे.
मतमोजणी सुरू होण्यापूर्वी येणारी पोस्टल बॅलेट स्वीकारण्यात येतील. पोस्टल बॅलेटची मतमोजणी 15 टेबलवर होणार आहे. सैनिक मतदारांसाठी ईटीपीबीएस देण्यात आले होते. ही मतमोजणीसाठी 5 टेबलवर होणार आहे. सर्वप्रकारची मतमोजणी 40 टेबलवर होणार आहे. पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाल्यानंतर 8.30 वाजता मतदान यंत्रावरील मतमोजणी होणार आहे. मतमोजणी 12 ते 12.30 वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी सातारा तहसीलदार नागेश गायकवाड, जावली तहसीलदार हणमंतराव कोळेकर, सातारा तालुका भूमि अभिलेख उपअधीक्षक तुषार पाटील, सातारा मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते.