>>महेश उपदेव
23 नोव्हेंबर 1994 हा दिवस राज्याच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी नागपूरच्या झिरो माईल्सजवळ 114 निष्पाप मोर्चेकरी गोवारींचा पोलिसांच्या लाठीमारात मृत्यू झाला होता. ज्या मागणीसाठी गोवारी समाजाने तो मोर्चा काढला होता, त्या मागण्या 30 वर्षांनंतर आजही कायम आहेत.
23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूरच्या मॉरीस कॉलेज टी-पॉइंटला साधारण 50 हजार गोवारी सकाळीच धडकले. ‘आम्ही आदिवासीच आहोत’, असे ठामपणे सांगत, ‘आम्हाला आदिवासींच्या सवलतींपासून वंचित ठेवू नका’, अशी त्यांची मागणी होती. लोखंडी पुलाकडून टी-पॉइंटकडे येणाऱ्या लहान रस्त्यांवर विधानसभेवर काढलेला हा मोर्चा अडवला होता. त्यावेळी इथला उड्डाणपूल नव्हता.
माजी आमदार सुधाकर गजबे, आदिवासींचे नेते डॉ. राजेंद्र गजबे यांच्या नेतृत्वात विदर्भातील गोवारी आपल्या बायकामुलांसह नागपुरात धडकले होते. सरकारकडून कुणीच मोर्चाच्या भेटीला येत नाहीत, असे समजताच गोवारींमध्ये असंतोष उफाळून आला. सायंकाळी परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, या भीतीपोटी पोलिसांनी मोर्चावरच लाठीमार केला. त्यातून चेंगराचेंगरी झाली आणि 114 गोवारींचा मृत्यू झाला होता. गोंड-गोवारी या जमातीला महाराष्ट्रात स्वतंत्र अस्तित्व नाही किंवा ती गोंड जमातीची उप-जमातही नाही. गोंड-गोवारी असे संबोधले जाणारे सर्वजण मूळ गोवारीच आहेत. गोंड आणि गोवारी या दोन भिन्न जमाती आहेत आणि गोंडाप्रमाणे गोवारीदेखील आदिवासीच आहेत.
या घटनेच्या स्मरणार्थ मॉरीस कॉलेज टी-पॉईंटला गोवारी शहीद स्मारक उभारण्यात आले. दरवर्षी गोवारी बांधव इथे आपल्या सहवेदना प्रकट करण्यास न चुकता येतात.
गोवारी ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 14 ऑगस्ट 2018 रोजी दिला होता. त्यामुळे 28 वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या गोवारींच्या संघर्षाला यश मिळाले. पण न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी सरकारने अजूनही केलेली नाही.