Published on
:
23 Nov 2024, 12:25 am
Updated on
:
23 Nov 2024, 12:25 am
सांगोला : सलग तिसर्या वर्षी लम्पी संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. मागील तीन-चार महिन्यांत तालुक्यात 50 जनावरांना लम्पी या रोगाची लागण झाली आहे. सध्या बाधित जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून डॉ. असलम सय्यद यांनी दिली आहे.
मागील वर्षी सांगोला तालुक्यात पाच हजार 500 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली होती. यामध्ये पशुवैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार 391 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर लसीकरण व औषध उपचार करून आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाला यश मिळाले होते; परंतु सलग तिसर्या वर्षी लम्पी या आजाराने सांगोला तालुक्यात पुन्हा थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग जोमाने कामाला लागला आहे. पुन्हा शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात लम्पीचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकर्यांना आपल्या पशुधनाला मुकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सातत्याने लसीकरण, शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मात्र अजूनही प्रादुर्भाव सुरूच आहे. तालुक्यात पुन्हा लम्पीने धुमाकूळ घातला असून पशुपालक चिंतेत आहे. यावर पशुसंवर्धन विभागाकडून ठिकठिकाणी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.
आवश्यक ती जनजगृती पशुपालकांमध्ये करण्यात येत आहे. दरम्यान, खिलार जनावरे व जर्सी गाय यांना सर्वाधिक लम्पी या रोगाची लक्षणे आढळून येत आहेत. यामध्ये आजाराने पशुधन दगावत असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांकडून दिलेल्या नियमित उपचार पद्धतीने जनावरांना योग्य तो उपचार सुरू ठेवावा, असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
लम्पी हा आजार तालुक्यात पुन्हा वाढत आहे. बाधित जनावरांना शंभर टक्के लसीकरण करण्यात येत असून सध्या बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर बाधित जनावरांना भेटी देत आहेत. वेळोवेळी शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात आहे. जनावरांना लम्पीची लक्षणे आढळून आल्यास विलगीकरण करून तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डॉ. असलम सय्यद, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, सांगोला