Ajit Pawar Deputy Chief Minister of MaharashtraPudhari News Network
Published on
:
16 Nov 2024, 5:59 am
शहापूर : भारताचे संविधान इतके परफेक्ट आहे की ते बदलण्याचा काही प्रश्नच नाही. संविधानात लोकशाहीला महत्व असून प्रत्येक मताला महत्व दिले असून विरोधकांनी संविधान बदलून आरक्षणही बंद करण्यात येईल अशा वावड्या उठवल्या आणि आम्हाला लोकसभेला फटका बसला. तसेच कांदा निर्यात बंदीचा देखील फटका बसला अशी कबुली देऊन विरोधकांच्या संविधान बदलण्याच्या थापांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील, शिवसेना नेते प्रकाश पाटील, सरचिटणीस डी.के.विशे,जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे, उमेदवार दौलत दरोडा, प्रमोद हिंदुराव, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारमळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना साडे सहा लाख कोटींचा बजेट असताना यामध्ये साडेतीन लाख कोटी पगार, पेन्शन व घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला जातात व उर्वरित रक्कम विकासाला खर्च केली जाते. दरम्यान शहापूरच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याचे शेवटी अजित पवार यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. शहापूर मतदार संघातील 50 वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला वाशिंदचा ब्रीज व कळमगाव जवळील रेल्वे अंडरपास मी खासदार झाल्यानंतर पूर्ण केला असल्याचे सांगून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने बहिणींनी भावाला रिकाम्या हाताने न पाठवता मतदानाच्या माध्यमातून रिटर्न गिफ्ट देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित महिला वर्गाला केले.