मोताळा (Buldana):- तालुक्यातील बोराखेडी वडगाव रोडवर सिमेंटचे पोल घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली पुन्हई फाटयाजवळ पलटी झाली. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital)मोताळा येथून पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले. यामध्ये उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू (Death)झाला. मृतकांची नावे मंगेश सातव व रामदास बेलोकार असे असून ते नांदुरा तालुक्यातील वाडी येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
जखमीवर बुलढाण्यातील एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु
मोताळा येथून आज रविवार 22 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर क्र. एम. एच. 40 ए-3487 सिमेंटचे पोल घेवून बोराखेडी वडगाव रोडने चालले हेाते. ट्रॅक्टरमध्ये (Tractor) पाच ते सहा मजूर होते. दरम्यान ट्रॅक्टरची ट्रॉली पुन्हई फाट्याजवळील एका वळणावर पलटी झाली. यामध्ये ट्रॅक्टरमधील सिमेंटचे 11 पोल मजुरांच्या अंगावर पडल्याने यामध्ये रामदास बेलोकार (वय 40), संतोष बेलोकार (वय 35), हरीश बेलोकार (वय 23), मंगेश सातव (वय 32), शुभम खंडारे (वय 21) हे मजूर पोलखाली दबून गंभीर जखमी झाले. यावेळी मोठा आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहचून जखमींना बाहेर काढले. पोलिसांना माहिती मिळताच बोराखेडी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना 108 ॲम्बुलन्सने (Ambulance) ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे नेण्यात आले, उपचारा दरम्यान वाडी ता.नांदुरा येथील मंगेश ज्ञानदेव सातव व रामदास पुंजाजी बेलोकार यांचा मृत्यू झाला. इतर जखमीवर बुलढाण्यातील एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. वृत्तलिहेपर्यंत बोराखेडी पोलिसात फिर्याद दाखल नव्हती.