हॉकीचे आशियाई चॅम्पियन्स!

2 hours ago 2

भारताने पाचव्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियन्स जेतेपदावर मोहोर उमटवली.Pudhari File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

22 Sep 2024, 12:06 pm

Updated on

22 Sep 2024, 12:06 pm

भारताने सर्वाधिक पाचव्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियन्स जेतेपदावर मोहोर उमटवली, त्यावेळी आणखी एकदा भारताच्या एकक लमी वर्चस्वावर जरूर शिक्कामोर्तब झाले. अन्य प्रतिस्पर्धी आशियाई संघाचा सध्याचा दर्जा पाहता ते अपेक्षितही होते. पण, आशिया खंडाबाहेर खेळताना अधिक ताकदीने मैदानात आव्हान निर्माण करायचे असेल तर भारताला आणखी मेहनत घ्यावी लागेल, प्रशिक्षणातील नव्या संधींचा शोध घ्यावा लागेल. तसे झाले तरच संघाला आणखी पैलू पडतील आणि आशियाबाहेर देखील हा हिरा चमकण्याची, सुवर्णयुगाची पुनरावृत्ती करण्याची आशा-अपेक्षा करता येईल.

चीनविरुद्धची अंतिम लढत अतिशय उत्कंठापूर्ण, अक्षरश: श्वास रोखून धरणारी होती. प्रतिस्पर्ध्यांनी अगदी इंच न् इंच मैदान लढवत खर्‍या अर्थाने सामन्यात जान भरली होती. त्यामुळे गोल नोंदवण्याच्या संधी निर्माण करणे अशक्यप्राय ठरत होते. मात्र, मागील वर्षापासून संघबांधणी उत्तम झाली आहे. शिवाय, खेळ एकजिनसी झाला आहे. एकमेकांसाठी काहीही करू, अशी सर्व संघ सहकार्‍यांची समर्पित भावना असते आणि याच बळावर आम्ही प्रत्येक वेळी विजय खेचून आणण्यात यशस्वी होत आलो आहोत... हे उद्गार आहेत भारतीय हॉकी संघाचा स्टार कर्णधार हरमनप्रीतचे... भारताने आशियाई चॅम्पियन्स हॉकी चषक स्पर्धा पाचव्यांदा जिंकली आणि त्यानंतर हरमनप्रीत ओतप्रोत विश्वासाने भरभरून बोलत होता.

संघ सहकार्‍यांवर स्तुतिसुमने उधळताना उपकर्णधार विवेक सागर प्रसाद देखील फारसा मागे नव्हता. तो म्हणाला, साखळी फेरीत आम्ही ज्या संघांविरुद्ध खेळलो, ते सर्वच संघ लढवय्ये होते. ऑलिम्पिक कांस्यपदकामुळे मनोबल उंचावलेले होते. पण, अपेक्षाही वाढल्या होत्या. त्या पूर्ण करण्यात यश येत आहे, याचा विशेष आनंद आहे. कृष्णन, सुरज यांच्यासारखे युवा गोलरक्षक भक्कम बचाव साकारण्यात यशस्वी ठरताहेत तर मध्य फळी, आघाडी फळी यांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडण्यात अजिबात कसर सोडली नाही! तसे पाहता सहा देशांच्या या स्पर्धेत चीन हा सर्वात नीचांकी मानांकित संघ. पण, अंतिम सामन्यात त्यांनीही भारताला झगडणे भाग पाडले. त्यामुळे या विजयाचे महत्त्व थोडे औरच होते. जुगराजने 51 व्या मिनिटाला मैदानी गोल साकारत कोंडी फोडेतोवर भारताला या लढतीत कुठेच संधी निर्माण करता आली नव्हती, हे ओघानेच आले.

चीनने येथे उपजेतेपदापर्यंत मजल मारली असली तरी त्यांची स्पर्धेतील सुरुवात खूपच खराब स्वरूपाची झाली होती. त्यांना सलग तीन सामने गमवावे लागले आणि यात भारताने 3-0 फरकाने नमवले, त्या लढतीचाही समावेश होता. पण नंतर त्यांनी मलेशिया, जपान व पाकिस्तान यांच्याविरुद्ध ओळीने सलग तीन सामने जिंकले आणि अशारीतीने फायनलमध्ये धडक मारली. त्यांच्यासाठी ही केवळ दुसरी फायनल होती. (त्यापूर्वी ते 2006 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते आणि त्यावेळी त्यांना दक्षिण कोरियाने धूळ चारली होती.)

भारतीय संघाची आजवरची वाटचाल पाहता मागील वर्षातील आशियाई चॅम्पियन्स चषकातील सुवर्ण, हँग्झू आशियाई सुवर्ण व पॅरिस ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कांस्य एकूणच मनोबल उंचावणारी ठरते आहे. अर्थात या विजयानंतरही काही चिंतेच्या बाबी देखील जरूर आहेत. चीनविरुद्ध बॉल पझेशनच्या निकषावर भारताने 84 टक्के वर्चस्व गाजवले असले तरी त्यात गोल निर्माण करण्याची संधी फारशी निर्मिता आली नाही, ही यातील सर्वात मोठी बाब. चायनीज बचाव फळीने भारताच्या जवळपास प्रत्येक फॉरवर्ड खेळाडूला मार्क केले होते आणि याचमुळे भारताला गोल कोंडी फोडता येत नव्हती.

वँग वेईहाओचे योगदान त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे होते. त्याने हरमनप्रीतचे ड्रॅग फ्लिकचे फटके लीलया परतावले. शिवाय अभिषेक, सुखजीत यांचीही आक्रमणे परतावून लावण्यात मोलाचा वाटा उचलला होता. अर्थातच बॉल पझेशनच्या आघाडीवर भारत सरस होता. मात्र, तरीही या वर्चस्वाचे गोलमध्ये आक्रमण होत नसल्याने त्याची खंत मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टॉन यांच्या बॉडी लँग्वेजमधून जाणवत होती. अर्थात कुठे तरी एक नामी संधी येणारच होती आणि ती सामन्याच्या 51 व्या मिनिटाला आली. सामना संपण्यासाठी अवधी 9 मिनिटे बाकी असताना ती संधी आली. याचे कारण म्हणजे हरमनप्रीतने नेहमीपेक्षा वेगळ्या पठडीतील निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. एरवी हरमनप्रीत सेंटर किंवा राईट बॅकला खेळतो. पण येथे त्याने लेफ्ट फ्लँककडे मोर्चा वळवला. मोठा कॉर्नर घेत एकहाती चेंडू स्ट्रायकिंग सर्कलमध्ये आणला, तीन चायनीज बचावपटूंना भेदत जुगराजकडे अप्रतिम पास दिला आणि जुगराजने त्या पासवर गोलजाळ्याचा वेध घेणे हे जणू आयसिंग ऑन द केक होते! शेवटचीच काही मिनिटे बाकी असल्याने चीनला बरोबरीत येण्यासाठी कोणता ना कोणता जुगार खेळावाच लागणार होता. तो त्यांनी प्रशिक्षक यू सेऊंग जून यांच्या सूचनेनुसार, गोलरक्षकाला हटवत आणखी एक खेळाडू आक्रमणासाठी उतरवण्याच्या माध्यमातून खेळला. पण तरीही ते प्रयत्न अजिबात यशस्वी ठरणार नव्हते, विजयश्रीने त्यापूर्वीच भारताच्या गळ्यात विजयाची माळ घातली होती.

खरं तर भारताने दक्षिण कोरियाचा एकतर्फी फडशा पाडला, त्याचवेळी भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, हे स्पष्ट झाले होते आणि चीनविरुद्ध अंतिम लढतीतील विजयानंतर त्यावर मोहोर उमटली. पेनल्टी कॉर्नरप्रमाणे मैदानी गोल साकारण्यातही हुकूमत असेल, याकडे भारताने मागील काही कालावधीत बरीच मेहनत घेतली असून त्याचे प्रतिबिंब अलीकडील काळात संघाच्या कामगिरीत थोडेफार उमटते आहे. उत्तम सिंग, जरमनप्रीत सिंग यांच्या काही गोलनी त्याचे प्रत्यंतर आणून दिले. गोलरक्षणात पीआर श्रीजेश निवृत्त झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यात कृष्णन पाठक व सुरज करकेरा मेहनत घेत आहेत, हे या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आले.

आता चीनने या स्पर्धेत यापूर्वी आपल्याला कधी अंतिम फेरीत पराभूत केले नव्हते, असे अजिबात नाही. 2013 च्या आवृत्तीत त्यांनी आपल्यावर 2-0 अशी एकतर्फी मात केली होती. पण यंदा हरमनप्रीत व संघ सहकार्‍यांनी तसे अजिबात होऊ दिले नाही. त्यांनी अगदी इंच न् इंच मैदान लढवले आणि गोलकोंडी फुटत नसतानाही संयम व प्रतीक्षेवर भर दिला आणि ज्यावेळी गोलची संधी मिळाली, त्यावेळी त्याचे सोने करत आपणच आशियाई चॅम्पियन्स असू, याची पुरेपूर तजवीज केली.

भारतासाठी ही 8 स्पर्धांमधील सहावी फायनल होती आणि पाचवे जेतेपदही होते, त्यावरून आपला वरचष्मा दिसून येतो. सहा संघ सहभागी असताना पाच सामन्यांच्या राऊंड रॉबिन सामन्यात भारताने ओळीने पाच विजय मिळवत आपली हुकूमत अधोरेखित केली. 28 वर्षीय हरमनप्रीत सिंगसारखा करिष्माई कर्णधार असल्याने व त्यांना क्रेग फुल्टॉनसारख्या निष्णात प्रशिक्षकाची जोड असल्याने भारताला हे जेतेपद खेचून आणता आले, हे देखील तितकेच खरे. हरमनप्रीत व संघ सहकार्‍यांसह भारतीय हॉकीचा हा मजल-दरमजल प्रवास आता चौथ्या पदकावर शिक्कामोर्तब करण्यात यशस्वी ठरला असून हाच धडाका त्यांनी यापुढेही कायम ठेवणे अपेक्षित असणार आहे. स्टार डिफेंडर व अव्वल ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत भारतीय संघासाठी मुख्य आधारस्तंभ ठरत आला असून त्याच्या कुशल नेतृत्वामुळेच भारताला या स्पर्धेत पुन्हा एकदा यशावर सहज स्वार होता आले आहे.

आशियाई हॉकीतील एकंदरीत वाटचाल पाहता मलेशिया, पाकिस्तान यांनी अलीकडील दशकभरात बराच सूर हरवला असून गतवैभवाच्या पाऊलखुणा शोधण्यावर त्यांचा भर राहात आला आहे. पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी आपला स्वतंत्र ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला असला तरी एकजिनसी खेळावर भर नसल्याने याची त्यांना कुठे ना कुठे किंमत मोजावीच लागते. कोणत्याही तयारीशिवाय, पाठबळाशिवाय शालेय मुलांना खाली ढकलून दिल्यानंतर ती जशी झगडावीत, तशी पाकिस्तानची स्थिती राहात आली आहे. मागील दशकभरातील मानांकनावर लक्ष टाकले तर असे लक्षात येते की, टॉप-10 संघात एखादाच आशियाई संघ असतो आणि पाचहून अधिक संघ युरोपातील असतात. या परिस्थितीत झपाट्याने बदल अपेक्षित असेल तर त्यासाठी मुळात आशियाई हॉकीचा दर्जाच अधिकाधिक उंचावणे ही काळाची गरज असेल. भारतीय संघाने मजल-दरमजल प्रगती केली असली तरी कमकुवत प्रतिस्पर्ध्यांमुळे कुठे तरी त्याला खीळ बसतेच बसते, हे देखील नाकारून चालणार नाही.

जागतिक हॉकीत एकेकाळी साम्राज्य गाजवणार्‍या दक्षिण कोरियाला अलीकडील कालावधीत मात्र बर्‍याच अंशी झगडावे लागले आहे. जपानने वेळोवेळी मुसंडी मारण्याचे प्रयत्न जरूर केले. पण त्यांचे यश मर्यादित राहिले आहे. आशियाई प्रतिस्पर्ध्यांचा दर्जा पाहता त्यांना युरोपियन संघांविरुद्ध झगडावे लागते, ही सद्य:स्थिती आहे. चीनचा भक्कम बचाव ही त्यांच्या खेळाची खासियत असली तरी अलीकडील कालावधीत या भक्कम बचावाला देखील भगदाड पाडता येऊ शकते, हे आपल्या संघानेही सोदाहरण दाखवून दिले आहे. तूर्तास भारतीय संघ हॉकीचे सुवर्णयुग प्राप्त करण्याच्या दिशेने अश्वदौड जरूर करत आहे. पण आशियाई स्तरावरील संघ दुबळे असल्याने तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्याचाही काही प्रमाणात फटका बसत असल्याचे चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article