नगरमध्ये 23 ते 25 सप्टेंबरला जोरदार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

2 hours ago 2

नगर जिल्‍ह्याच्या काही भागात 23 ते 25 सप्टेंबर 2024 या कालावधीत वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस, तसेच 26 सप्टेंबर रोजी वीजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्‍ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्‍यात आलेला आहे.

पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यात अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे जिल्‍ह्यातील भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत, दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या लोंबणाऱ्या केबल्‍सपासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज्) कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्‍यासाठी दक्षतेची बाब म्‍हणून जाहिरात फलकांच्‍या आजूबाजूला थांबू नये व योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा.

स्‍थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना तातडीने सुरक्षितस्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्‍यासाठी गर्दी करू नये. अतिवृष्‍टीमुळे भूस्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्‍यावी. वेळीच सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे.

धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय नगर येथील दूरध्‍वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844 अथवा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article