मराठा आणि ओबीसी आरक्षणाच मुद्दा तापला, मनोज जरांगे पाटील-लक्ष्मण हाके समर्थक आमने-सामने

2 hours ago 2

Maratha VS OBC preservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन छेडलेल्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके समर्थक आमने-सामने येतात. आज तणावपूर्ण शांतता असली तरी फक्त ५ किलोमीटरच्या पट्ट्यात सुरु असलेल्या ३ उपोषणाच्या आंदोलनामुळे आरोप-प्रत्यारोप होतात. जरांगेंच्या उपोषणानंतर वडीगोद्रीत सुरु झालेल्या उपोषणस्थळाच्या मार्गावर दोन्ही बाजूने घोषणाबाजीचं सत्र कायम आहे. कालही या ठिकाणी वाद झाले होते. घोषणा आणि शब्दाला-शब्द वाढल्यामुळे जरांगे-हाके समर्थक आमने-सामने आले.

ओबीसींसाठी आंदोलन सुरु

वास्तविक महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ 3 लाख 7 हजार 713 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलंय. मात्र उपोषण आणि समर्थकांचा वाद फक्त ५ किलोमीटरच्या परिघात घडतोय. हे जरांगेंचं अंतरवाली सराटी गाव आहे. 17 सप्टेंबरपासून त्यांनी गावात उपोषण सुरु केलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मूळ पुण्याचे असणारे मंगेश ससाणे अंतरवाली सराटीत पोहोचले आणि 18 सप्टेंबरपासून त्यांनी ओबीसींसाठी आंदोलन सुरु केलं. यानंतर मूळ जालन्यातल्या घनसावंगीचे नवनाथ वाघमारे आणि सोलापूरच्या सांगोल्याचे लक्ष्मण हाके वडीगोद्रीत गावात पोहोचून उपोषणाला बसले. 19 सप्टेंबरला दोघांनी उपोषण सुरु केलं.

वडीगोद्री हे गाव अंतरवाली सराटीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. वडीगोद्री गावच्या समोरुन हा धुळे-सोलापूर महामार्ग जातो. त्यांच्या बरोब्बर प्रवेशावरच हाके उपोषणाला बसले आहेत. अंतरवालीत जाण्यासाठी वडीगोद्रीमार्गे हा एकच प्रमुख पक्का रस्ता आहे. जरांगेंचे समर्थक वाहनं घेवून अंतरवालीला जात असताना त्यांना हाके उपोषणाला बसलेल्या एन्ट्री पॉईंटवरुन जावं लागतंय आणि इथंच घोषणाबाजीवरुन काल दोन्हीकडचे समर्थक भिडले.

उपोषणस्थळावरुन आरोप-प्रत्यारोप

आता कुणी कुठे उपोषणाला बसावं याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असला तरी जरांगे त्यांच्या मूळ गावी अंतरवालीत उपोषण करतायत. तर त्यांच्या गावात ससाणे आणि ५ किलोमीटरच्या अंतरावर हाकेंनी उपोषणस्थळ निवडल्यामुळे आरोप-प्रत्यारोप होतायत. आरक्षणावरुन जरांगे मुख्यत्वे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करतायत. तर लक्ष्मण हाके फडणवीसांची बाजू सावरत शिंदेंना टार्गेट करु लागले आहेत.

स्पर्धा असलेली साधी गणेशमंडळं किंवा नेत्यांच्या रॅल्या जरी आल्या तरी घोषणाबाजीनं वाद निर्माण होतात. तोच प्रकार वडीगोद्रीच्या प्रवेशद्वाराजवळ होतोय. मात्र संभाव्य तणावाची कल्पना असूनही पोलिसांनी इतक्या जवळ-जवळ अंतरावर आणि ते सुद्धा एकाच मार्गावर उपोषणाला मान्यता कशी दिली, हा देखील प्रश्न आहे.

जरांगेंच्या समर्थनात बंदची हाक

दरम्यान जालना, परभणी, पाथरीसह विविध शहरात जरांगेंच्या समर्थनात बंदची हाक देण्यात आली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंबर दोनवाल्यांचे मुख्यमंत्री असल्याची टीका हाकेंनी केलीय. मागण्यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक निर्णयाचा सर्वाधिकार महाराष्ट्र सरकारकडे आहेत. मात्र मागण्यांच्या वादात दोन गटच एकमेकांसमोर आल्यामुळे वडीगोद्रीत वाद निर्माण होतोय. तूर्तास ही वादाची ठिणगी सर्वत्र महाराष्ट्रात न पसरवू देण्याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे. फक्त जमावानं आणि खासकरुन तरुणांनी कायदा हाती न घेता शांततेनं आपलं म्हणणं मांडणं गरजेचं आहे. कारण अशा वादात दाखल होणाऱ्या खटल्यांमधून बाहेर पडता-पडता अर्ध आयुष्य खर्ची पडतं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article