धुळे जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेस प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाईल ॲपच्या माध्यमातून पशुगणना केली जाणार आहे.(छाया : यशवंत हरणे)
Published on
:
26 Nov 2024, 6:39 am
धुळे : धुळे जिल्ह्यात 21 व्या पंचवार्षिक पशुगणनेच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. ही पशुगणना सोमवार, दि. 25 नोव्हेंबर, 2024 ते 28 फेब्रुवारी, 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. 21 व्या पशुगणनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संदीप निकम, सहा. आयुक्त डॉ. मिलिंद भणगे आदी उपस्थित होते.
या पशुगणनेसाठी दर तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निधीची उपलब्धता करणे सोयीचे ठरणार आहे. राज्यात पशुसंवर्धन विभागाकडुन दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जात असून मागील पशुगणना 2019 मध्ये करण्यात आली होती. पशुगणनेसाठी पशुसंवर्धन विभागाकडून 150 प्रगणकांची व 34 पर्यवेक्षकांची नेमणुक केली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नेमणूक केलेल्या प्रगणकांना स्वतःचे मोबाईलवर माहिती भरता येणार आहे.
अशी माहिती केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सॉफ़्टवेअरवर भरावी लागणार आहे. प्रगणकांना मानधन आणि मोबाईल वापराचा वेगळा मोबदला देण्यात येणार आहे. प्राधान्याने पशुधन पर्यवेक्षक, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहीमेत गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, ससे, भटके पशुधन यांची गणना केली जाणार आहे. पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होणार असून त्यानुसार शासनाकडून धोरण, योजना आखल्या जातात. निधीची, संसाधनांची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात पशुधन संख्येनुसार लसमात्रा, औषधांचा पुरवठा केला जातो.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्याकडे पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून आपल्याकडील पशुधनाची अचूक व योग्य ती माहिती देण्यात यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.गिरीश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संदीप निकम, सहाय्यक आयुक्त डॉ.मिलिंद भणगे यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देऊन कामकाज सुरू करणे संदर्भात माहिती दिली.