सेलू पोलिसांत मर्ग दाखल
सेलू/वर्धा (Farmer termination Case) : कर्जबाजारीपणामुळे विवंचनेत राहणाऱ्या शेतकऱ्याने शहरालगत असलेल्या मौजा बेलगाव शिवारातील बोर नदीत आत्महत्या केल्याची घटना 19 नोव्हेंबर मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कवडुजी डोमाजी रेवतकर वय 60 वर्ष रा. भगत लेआऊट सेलू असे मृतकाचे नाव आहे. त्यांचेवर कांढळी येथील बँक ऑफ इंडियाचे 1 लाख 60 हजार रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक कवडुजी रेवतकर यांची समुद्रपूर तालुक्यात कांढळी शिवारात 6 एकर शेती आहे. त्या शेतावर गेल्या चार वर्षांपासून कांढळी येथील बँक ऑफ इंडियाचे 1 लाख 60 हजार रुपये पीक कर्ज असून सततच्या नापिकीने आणि शेत मालाला भावबाजी नसल्यामुळे पीककर्जाची परतफेड होत नव्हती. त्यामुळे गत काही दिवसांपासून ते चिंतेत राहायचे. त्या विवंचनेत तीन चार दिवसांपासून त्यांना दारूचे व्यसन लागले होते. आज सकाळीसच ते घरून बाहेर गेले होते.
मंगळवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने दुपारी 4 वाजताच्या सुमारास येणाऱ्या जाणाऱ्यांना बोर नदीत पुलाखाली एक इसम पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यामुळे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश राऊत व ज्ञानदेव वणवे यांनी (Farmer termination Case) घटनास्थळी येत मृतदेह नदीबाहेर काढल्यानंतर मृतकाची ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास सेलू पोलीस करीत आहे.