Published on
:
22 Nov 2024, 12:11 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:11 am
किव्ह : रशियाने प्रथमच युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्र हल्ला केला. रशिया-युक्रेन युद्धात दीर्घ टप्प्यातील घातक बॅलिस्टिक मिसाईलचा प्रथमच वापर करण्यात आला आहे. युक्रेनने अमेरिका आणि ब्रिटन बनावटीच्या क्षेपणास्त्राद्वारे रशियावर हल्ला केल्यामुळे रशियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागण्यास प्रारंभ केला आहे.
दोन्ही देशांमध्ये 1000 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. हल्ले-प्रतिहल्ल्यामुळे जीवित आणि वित्तहानी होत आहे. युक्रेनमधील पायाभूत प्रकल्पांवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आला. दरम्यान, युक्रेनकडूनही रशियावर विध्वंसक क्षेपणास्त्रे डागण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. दोन्ही देशातील तणावामुळे अमेरिकेने किव्हमधील दुतावास बंद केले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की यांना लांब पल्ल्याच्या अमेरिकन क्षेपणास्त्रांचा वापर रशियाविरोधात करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर तत्काळ झेलन्स्की यांनी अमेरिकन क्षेपणास्त्रे डागली आहे. त्यानंतर आता झेलन्स्की यांनी स्टॉम शॅडो नावाची क्षेपणास्त्रे रशियावर डागली आहे. रशियाकडून युद्धात उत्तर कोरियाचे सैन्य उतरल्याने झेलन्स्की हे संतप्त झाल्याने त्यांनी रशियावर विनाशकारी क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली आहे. विशेष करून युक्रेनच्या सीमेवर लागून असलेल्या रशियाच्या कुर्स्क प्रातांत क्षेपणास्त्रे डागली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
युक्रेनने रशियावर पहिल्यांदाच ब्रिटिश स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. याच्या एक दिवसापूर्वी अमेरिकेच्या एटीएसीएमएस ही क्षेपणास्त्रे रशियावर डागण्यात आली. स्टॉर्म शॅडो हे क्रुझ क्षेपणास्त्र असून, ते ब्रिटन आणि फ्रान्सने तयार केले आहे. पण, रशियाविरोधात या क्षेपणास्त्रांचा वापर केला नसल्याचे युक्रेनचे संरक्षण मंत्री रूस्तम उमेरोव्ह यांनी सांगितले.