Hingoli Bazar Samiti: हिंगोली कृउबास: तीन संचालकांच्या अपात्रतेला स्थगिती

2 hours ago 1

विभागीय सहनिबंधकांचा निर्णय

हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपात्र ठरविण्यात आलेल्या तीन संचालकांची अपात्रता विभागीय उपनिबंधकांनी स्थगित केली आहे. गुरूवारी याबाबत आंतरीम स्थगितीचे आदेश देण्यात आले असून, पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

२०२३ मध्ये झालेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Hingoli Bazar Samiti) संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठी चुरस झाली होती. त्यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व राजेश पाटील गोरेगावकर अशा तीन राजकीय स्पर्धकांनी एकत्र येऊन निवडणूक लढविली होती. त्यावेळी याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन एक पॅनल तयार केले होते. त्या पॅनलला त्यावेळी मोठे यश मिळाले होते. या पॅनलचे सदस्य असलेल्या तीन संचालकांविरूद्ध परसराम मोतीराम राऊत रा.कानडखेडा, शंकर माधवराव पोले रा.वाळकी ता.औंढा ना.यांनी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवरून संचालक माधव बळीराम कोरडे, अशोक सिताराम श्रीरामे व शामराव आनंदराव जगताप या तीन संचालकांना जिल्हा निबंधकांनी अपात्र ठरविले होते. या निकालाविरूद्ध तिन्ही संचालकांनी विभागीय सहनिबंधक शरद जरे यांच्याकडे अपिल दाखल केली होती. या अपिलावर गुरूवारी झालेल्या सुनावणी दरम्यान विभागीय सहनिबंधकांनी आंतरीम आदेश पारीत केले आहेत. या आदेशानुसार तिन्ही संचालकांना अपात्र ठरविण्याच्या जिल्हा निबंधकांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. स्थगितीचे आदेश हे आंतरीम असून, पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

या तीन संचालकांपैकी अशोक श्रीरामे व शामराव जगताप हे शिक्षक असून शासकीय कर्मचारी असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती तर माधव कोरडे हे शासकीय कंत्राटदार असून तिघांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत शेती नसल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत देशोन्नतीशी बोलतांना अशोक श्रीरामे यांनी सांगितले की, जिल्हा निबंधकांनी चुकीच्या कलमाचा आधार घेऊन या प्रकरणात निर्णय दिला आहे. या प्रकरणात सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाणार असल्याचे विभागीय निबंधकांच्या आदेशात नमूद केले आहे.

तिन्ही संचालकांबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपाच्या कागदपत्राची सकृतदर्शनी खातरजमा होणे आवश्यक असल्याचे स्थगितीच्या आंतरीम आदेशात विभागीय सहनिबंधकांनी सांगितले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article