आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी आणखी एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.Twitter
Published on
:
15 Nov 2024, 11:06 am
Updated on
:
15 Nov 2024, 11:06 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Champions Trophy Tour : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी आणखी एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईहून इस्लामाबादला पाठवली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या ट्रॉफी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहे. म्हणजेच ही ट्रॉफी पाकिस्तानमधील वेगवेगळ्या ठिकाणी चाहत्यांमध्ये नेली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौराही जाहीर झाला आहे. दरम्यान ICC ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला आहे. याचा अर्थ पाकिस्तानला ट्रॉफी दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करावे लागतील.
PCB विरोधात ICC चा मोठा निर्णय
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 14 नोव्हेंबरला इस्लामाबादमध्ये पोहोचली आहे. आता 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ही ट्रॉफी पाकिस्तानातील विविध ठिकाणी चाहत्यांमध्ये नेली जाईल. वेळापत्रकानुसार ही ट्रॉफी स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी जाईल. यापैकी स्कर्दू, हुंजा आणि मुझफ्फराबाद ही ठिकाणे पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) येतात. पण ICC ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला आहे. खरं तर, ICC ने PCB ला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पीओकेमधील दौ-याला परवानगी नाकारली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 14 नोव्हेंबरलाच घोषणा केली होती, ‘पाकिस्तान तयार राहा. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ट्रॉफी दौऱ्याची सुरुवात 16 नोव्हेंबरपासून इस्लामाबाद येथे होणार आहे, जी स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद सारख्या पर्यटन स्थळांनाही भेट देईल. 16 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ओव्हल येथे 2017 मध्ये सरफराज अहमदने उचललेल्या ट्रॉफीची एक झलक पहा.’
प्रथमच स्पर्धेच्या वेळापत्रकापूर्वी ट्रॉफी दौ-याचे आयोजन
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पण टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने आणि प्रत्युत्तरात हायब्रीड मॉडेलसाठी पाकिस्तान तयार नसल्यामुळे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, आयसीसीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे, जेव्हा कोणत्याही अधिकृत स्पर्धेच्या वेळापत्रकाशिवाय ट्रॉफी दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. सहसा स्पर्धेचे वेळापत्रक किमान 100 दिवस अगोदर जाहीर केले जाते, त्यानंतरच ट्रॉफीचा दौरा सुरू होतो. मात्र यावेळी काही वेगळेच पाहायला मिळत आहे.