Published on
:
22 Nov 2024, 6:46 am
Updated on
:
22 Nov 2024, 6:46 am
मुंबई : Maharashtra Assembly Polls | राज्य विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले असून महायुती आणि महाआघाडी या दोघांनाही बहुमताचा १४५ हा जादुई आकडा गाठणे अवघड असल्याचे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसने हमखास निवडून येणाऱ्या आपल्या बंडखोरांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यावर काँग्रेसच्या पदरात १०१ जागा पडल्या. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. यात रामटेक मतदारसंघातील बंडखोर राजेंद्र मुळक आणि सोलापूरचे धर्मराव काडादी हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या बंडखोरांशी संपर्क साधला आहे. आबा बागुल, सुरेश जेथलिया, मनीष आनंद, कल्याण बोराडे, जयश्री पाटील, अविनाश लाड या अपक्ष निवडणूक लढलेल्या उमेदवारांशी काँग्रेसने संपर्क साधला आहे. राहुल मते या बंडखोरांना सहा वर्षांसाठी काँग्रेसने निलंबित केले आहे. तरीही या त्यांच्याशी संपर्क झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या बंडखोरांशी महायुतीचे नेतेही संपर्क साधत आहेत. इतरही बंडखोरांना काँग्रेस नेत्यांचे फोन गेले आहेत. रामटेक ही जागा महविकास आघाडीत ठाकरे गटाच्या वाट्याला गेली होती. तेथे काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. काँग्रेसची पूर्ण संघटना त्यांचा प्रचार करत होती. ते निवडून येतील, असे काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.
काडादींवरून काँग्रेसमध्ये गोंधळ
दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांना शेवटपर्यंत एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला. वास्तवात ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आमचा पाठिंबा अपक्ष उमेदवार काडादी यांना असल्याचे जाहीर केले. त्यामुळे यावरून काँग्रेसमध्ये गोंधळ आहे.